बुरखा घालून खेळणार नाही! हिंदुस्थानी महिला खेळाडूनं जपला बाणा

सामना ऑनलाईन । पुणे

हिंदुस्थानची महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पिअन सौम्या स्वामीनाथनने इराणमध्ये होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअनशीपमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. इस्लामिक देश इराणमध्ये स्कार्फ किंवा हिजाब घालून खेळण्याच्याविरोधात हिंदुस्थानी बाणा जपत खेळातून माघार घेतली आहे.

सौम्याने सांगितले की, इस्लामिक देश इराणमध्ये महिला खेळाडूंनी स्कार्फ किंवा हिजाब घालून खेळणे अनिवार्य आहे. मात्र अशी बंधन स्वीकारणं हे आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचं सांगत तिने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमध्ये महिलांनी बुरखा घालणं अनिवार्य आहे. पण सौम्या स्वामीनाथनने इराणचा हा हुकूमशाही कायदा मानण्यास नकार दिला आहे.

आपल्या एका ट्विटमध्ये सौम्या स्वामीनाथनने सांगितलं की,’मला माफ करा. इराणमध्ये २६ जुलै ते ४ ऑगस्ट होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअनशिपमधून माझं नाव मागे घेतलं आहे. इराणमध्ये स्कार्फ किंवा हिजाब घालणं अनिवार्य आहे. पण, यामुळे माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे. माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र व धार्मिक स्वातंत्र्य या सर्वांचेच उल्लंघन होत असल्याने मी इराणला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

सौम्या स्वामीनाथन प्रमाणेच अमेरिकन खेळाडू नाजी पिकिडेझ हिने ही अशाप्रकारे तेहरान व इराण मध्ये होणाऱ्या चॅम्पिअनशिपमधून आपलं नाव मागे घेतले होते.