रोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

विराटच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ कांगारूंना त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा फॉर्म पाहता हिंदुस्थानी संघासाठी हे अशक्य नाही. तरीही कांगारूंना कमी न लेखण्याचा सल्ला हिंदुस्थानचा  माजी कर्णधार सौरभ गांगुलीने दिला आहे. त्याशिवाय गांगुलीने कर्णधार विराट कोहलीला कसोटीतील फलंदाजीची क्रमवारी ठरवण्यासाठी विशेष सल्ला दिला आहे. हिंदुस्थानी कसोटी संघाची रचना पाहता मुरली विजय, लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्यापैकी दोघे सलामीला येतील. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, कोहली, अजिंक्य रहाणे हे अव्वल पाच फलंदाजांच्या जागा पूर्ण करतील. यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत संघात असेल आणि हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे रोहित सहाव्या स्थानी फिट बसेल. रोहितला सलामीला न खेळवता सहाव्या क्रमांकावर खेळवण्याचा कानमंत्र ‘दादा’ सौरभ गांगुलीने विराटला दिला आहे.