धोनीला संधी द्या, सुधारणा न झाल्यास पर्याय शोधा-सौरव गांगुली

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या टी-२० क्रिकेटमधील क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून, ते उपस्थित करणाऱ्यांच्या यादीमध्ये आता माजी कर्णधार सौरव गांगुलीचंही नाव सामील झालं आहे. महेंद्रसिंह धोनी याला त्याचा खेळ सुधारण्यासाठी संधी द्यायला हवी , जर त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर बीसीसीआयने त्याला पर्याय शोधावा असं स्पष्ट मत गांगुलीने व्यक्त केलं आहे.

न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये धोनीने त्याच्या नावलौकीकास साजेसा नसलेली संथ फलंदाजी केली, यामुळे धोनी आता टी-२० साठी योग्य नसल्याचं काही माजी क्रिकेटपटूंनी म्हणायला सुरुवात केली होती. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांनी धोनीच्या संथ फलंदाजीबाबत विधान केलं होतं. त्यापाठोपाठ गांगुलीनेही धोनीबाबत त्याचे मत व्यक्त केले आहे.

संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र धोनीच्या पाठी ठामपणे उभा असल्याचं बघायला मिळतंय. धोनीबाबत लोकं प्रश्नचिन्ह का निर्माण करतायत हेच मला कळत नाही असं कोहलीने म्हटलं आहे. धोनीने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे,याकडेही कोहलीने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. काही जण सातत्याने धोनीवर टीका करत असून हे बरोबर नाही असंही कोहलीने म्हटलं आहे.