दक्षिण अफ्रिकेचा हिंदुस्थानवर १३५ धावांनी दणदणीत विजय

सामना ऑनलाईन । सेंच्युरियन

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने बुधवारी हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेटमधला विजयरथ रोखला. केपटाऊन कसोटीत सपाटून मार खाणाऱया पाहुण्या टीम इंडियाला सेंच्युरियन येथील दुसऱया कसोटीत १३५ धावांनी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली ऍण्ड ब्रिगेडवर २-० अशा फरकाने मालिका पराभवाची आपत्ती ओढवली. याआधीच्या सलग नऊ मालिकांमध्ये हिंदुस्थानने पराभवाचा चेहरा पाहिलेला नव्हता. पहिलाच कसोटी सामना खेळणारा उंचपुरा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने दुसऱया डावात ३९ धावा देत ६ फलंदाजांना बाद करीत सामनावीराचा मान संपादन केला.

फलंदाजांनी घात केला – विराट कोहली
दक्षिण आफ्रिकेत आलेल्या अपयशाचे खापर कर्णधार विराट कोहली याने फलंदाजांवर फोडले. दोन्ही कसोटींत गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली, पण फलंदाजांना आपली जबाबदारी ओळखून खेळ करता आला नाही, अशी नाराजी विराट कोहलीने याप्रसंगी बोलून दाखवली.