दक्षिण कोरियामध्ये सार्वजनिक शौचालयात छुपे कॅमेरे लावण्याची समस्या हाताबाहेर

सामना ऑनलाईन । सियोल 

दक्षिण कोरियामध्ये सार्वजनिक शौचालयात छुपे कॅमेरे लावण्याचे प्रकार वाढल्याने तिथले सरकार हतबल झाले आहे. देशाची राजधानी सियोलमध्ये हे प्रकार टाळण्यासाठी सार्वजनिक शौचालयाची दररोज झडती घेतली जाते.

बीबीसी ने दिलेल्या वृत्तानुसार शौचालय आणि चेंजिग रुममध्ये छुपे कॅमेरे लावण्याचे प्रकार खूपच वाढले आहेत. गेल्या वर्षी पॉर्न फिल्म चित्रित करण्यासाठी वापरले जाणारे असे सहा हजार छुपे कॅमेरे शोधण्यात पोलिसांना यश आले. या कॅमेर्‍यातून चित्रित केलेले दृश्य बहुतांश वेळी संबंधीत व्यक्तीच्या परवानगीशिवाय पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले जातात. या वर्षी दोन हजार महिलांनी रस्त्यावर उतरून या प्रकरणाविरोधात आवाज उठवला होता. ‘माय लाईफ इस नॉट युवर पॉर्न’ असे फलक घेऊन निदर्शने करण्यात आली. आपले खासगी क्षण कुणीतरी चित्रित करत नाही ना या दहशतीखाली येथील महिला वावरत असतात.

खबरदारी म्हणून दर महिन्याला सियोलमध्ये प्रत्येक सार्वजनिक शौचालय तपासले जाते. शौचालयात कॅमेरे आहेत की नाही याची खात्री शौचालयाचे कर्मचारी दररोज करतात.

गेल्या वर्षी छुपे कॅमेरे लावण्यासंबधी गुन्ह्यात ५४०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे त्यात फक्त २ टक्क्याहून कमी लोकांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ५० सरकारी कर्मचार्‍यांना हे छुपे कॅमेरे शोधण्याची जवाबदारी सोपवली आहे, पण गेल्या दोन वर्षात त्यांना या कार्यात अपयश आले असून एकही कॅमेरा त्यांनी शोधला नाही.