तोट्यातल्या मोनोरेलला जाहिरातींचा आधार, दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांवरील जागा भाड्याने देणार

mono-railway
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

मोनोरेलला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मोठा तोटा सहन करावा लागला. पहिल्या टप्प्यातून फायदा मिळवता न आलेल्या मोनोरेलचा दुसरा टप्पाही अधांतरीच आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांमधील जागा जाहिरातींसाठी भाड्याने देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. याशिवाय वर्सोवा-घाटकोपर मेट्रोच्या डब्यांमध्येही जाहिराती घेतल्या जाणार आहेत.

वडाळा ते जेकब सर्कल हा मोनोरेलचा दुसरा टप्पा चांगला महसूल मिळवून देईल. या टप्प्यामधील दादर आणि लोअर परळ स्थानकातून प्रवासी संख्या चांगली असेल असा अंदाज आहे. मोनोरेलच्या स्थानकांतील जागा भाड्याने देण्यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार आहेत. दोन टेलिकॉम कंपन्यांनी मोनोरेलच्या पिलर्सखालची जागा मागितली आहे. सेल्यूलर कव्हरेज चांगले व्हावे यासाठी तिथे टेलिकॉम उपकरणे बसवण्याचा त्यांचा विचार आहे. त्यातून येणारे उत्पन्न 50-50 टक्के वाटून घ्यायचे अशी ऑफर त्यांनी एमएमआरडीएला दिली आहे. मोनोरेलच्या खांबांची जागा जाहिरातींसाठी भाड्याने देण्याचा प्रयत्न एमएमआरडीएने केला होता, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.

वडाळा-चेंबूर मोनोरेलचे प्रवासी घटले
म्हैसूर कॉलनी स्थानकात डब्यांना लागलेल्या आगीच्या घटनेनंतर मोनोरेलचा चेंबूर-वडाळा हा पहिला टप्पा वर्षभर बंद होता. गेल्या ऑगस्टपासून तो पुन्हा सुरू केला गेला. मात्र त्या मार्गावरील प्रवासीसंख्या 19 हजारांवरून घसरून 10 हजार झाली. दुसरा टप्पा पुढच्या वर्षीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मोनोरेलच्या डेपोचा विकास करून तेथील जागा निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी देण्याचीही एमएमआरडीएची योजना आहे.