अंतराळयान करणार सूर्याला स्पर्श

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा यंदा हीरक महोत्सवी वर्षं साजरं करत आहे. २९ जुलै १९५८ रोजी नासाची सुरुवात झाली होती. हीरक महोत्सवाच्या अनुषंगाने नासा अनेकविध मोहिमा आखण्याच्या विचारात आहे. यातील एका मोहिमेअंतर्गत नासाचं अंतराळयान सूर्याच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.

या सूर्यमोहिमेत अंतराळयान बुध आणि शुक्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने सूर्याच्या कक्षेत ६२ लाख किलोमीटर अंतरावर स्थिरावणार आहे. आजवर कोणतंही अंतराळयान सूर्याच्या इतक्या जवळ पोहोचलं नव्हतं. या मोहिमेत सूर्याच्या उष्णता क्षेत्राचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा प्रभामंडळातून येणारी उर्जा आणि सोलर एनर्जी पार्टिकल्स यांच्या परस्परसंबंधांवरही संशोधन केलं जाणार आहे.

या खेरीज जून २०१८ मध्ये मंगळ मोहीमही आखली जाणार असून मंगळाच्या पृष्ठभागावर सखोल संशोधन केलं जाणार आहे. तसंच, या मोहिमांमधून आपल्या सौरमंडळाबाहेर असणाऱ्या दोन लाख ताऱ्यांवर देखरेख ठेवली जाणार आहे.