अंतराळातील फेरफटका

दा. कृ. सोमण,[email protected]

स्पेस वॉक सामान्य माणसालाही अंतराळात चालणे आता भविष्यात शक्य होणार आहे. पाहूया कसा असतो हा अंतराळातील फेरफटका…

अंतराळ संशोधनातील प्रगती

४ ऑक्टोबर १९५७ रोजी रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह ‘स्पुटनिक’ यशस्वीपणे अंतराळात पाठविला. त्या दिवसापासून अंतराळयुगाचा प्रारंभ झाला. अंतराळयाने अंतराळात जाऊ लागली. १२ एप्रिल १९६१ हा दिवस अंतराळ संशोधन इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. त्या दिवशी ‘व्होस्टोक-१’ नावाच्या यानामधून युरी गागारीन या रशियन अंतराळवीराने पहिल्यांदा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली. युरी गागारीनचा हा पहिला अंतराळ प्रवास एक तास अठ्ठेचाळीस मिनिटांचा होता. परंतु या प्रवासामुळे अवकाशक्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला.

आपण ‘मॉर्निंग वॉक’ला जात असतो किंवा सायंकाळी बागेत फेरफटका मारीत असतो पण अंतराळवीर ‘अवकाशातही चालतात’ , ‘स्पेस वॉक’ करतात हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. अवकाशात ते केवळ चालत नाहीत तर तेथे महत्त्वाची कामेही करीत असतात. नुकताच आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राच्या बाहेर अत्याधुनिक कॅमेरा बसविण्यासाठी ‘नासा’च्या दोन अंतराळवीरांनी अवकाशात सहा तास ४९ मिनिटांचा ‘स्पेस वॉक’ केला. अंतराळात अंतराळयानाच्या बाहेर येऊन अधांतरी, वजनरहीत अवस्थेत ‘स्पेस वॉक’ करणे हे मोठे कठीण आणि रहस्यमय काम असते.

इथे जमिनीवर  ‘मॉर्निंग वॉकला जाणे आणि अंतराळात चालणे यात मोठा फरक आहे. आपण जमिनीवर चालतो तसे ते पायाने चालत मात्र नाहीत. वॉक शब्दाचा शब्दशः अर्थ इथे अभिप्रेत नसतो. अंतराळवीर अवकाशयानाच्या बाहेर येऊन वजनरहीत अवस्थेत तरंगत असतात. अवकाशात अंतराळवीरांचे अंतराळयानाच्या बाहेर राहणे यालाच ‘स्पेसवॉक’ असे म्हणतात. अर्थात त्यात अनेक धोकेही असतात. जर काही चूक झाली तर तेथे माफी नसते. मोठय़ा जोखमीचे ते काम असते. यासाठी त्यांचा स्पेससूट हा खूप महत्त्वाचा असतो. ‘नासा’च्या अंतराळवीरांनी आतापर्यंत २०५ वेळा ‘स्पेसवॉक’ केले आहे. आतापर्यंत एकूण ११ देशांतील अंतराळवीरांनी स्पेसवॉक करण्यात भाग घेतला आहे. स्पेसवॉक करण्यापूर्वी अंतराळवीराना खूप ट्रेनिंग दिले जाते.

अंतराळ प्रवासाच्या या मोहिमेत नंतर महिलांनीही भाग घेतला. १६ जून १९६३ रोजी व्हॅलेटिंना तेरेश्कोवा या रशियन महिलेने यशस्वी अंतराळ प्रवास करून अंतराळ संशोधनाच्या इतिहासात आपले नाव नोंदविले. त्यानंतर पुढे अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी प्रगती झाली.

१८ मार्च १९६५ रोजी रशियन अंतराळवीर अलेक्सी लिओनोव्ह याने पहिले ‘स्पेसवॉक ’ केले. तो दहा मिनिटे अंतराळयानाबाहेर राहिला. त्यावेळी अंतराळ संशोधन क्षेत्रात रशिया आणि अमेरिका यांची तीव्र स्पर्धा होती. ३ जून १९६५ रोजी अमेरिकन अंतराळवीर एड व्हाइट याने जेमिनी मिशनच्या वेळी स्पेसवॉक केले. तो २३ मिनिटे अंतराळयानाच्या बाहेर राहिला.

रशियन अंतराळवीर ऍनाटोली सोलोवेयर याने एकूण सोळा वेळा स्पेसवॉक केले. तो एकूण ८२ तास अवकाशयानाबाहेर राहिला. अमेरिकन अवकाशवीर मिचाएल लोपेज अलेग्रिआ याने एकूण १० वेळा स्पेसवॉक केले. तो एकूण ६७ तास अवकाशयानाबाहेर राहिला.

प्रत्यक्ष स्पेसवॉक

आपण आपल्या घराचा दरवाजा उघडून घराबाहेर पडतो तसे अंतराळवीरांना स्पेसवॉक करण्यासाठी अंतराळयानाच्या बाहेर येता येत नाही. अंतराळयानाला दोन दरवाजे असतात. प्रथम घातलेल्या स्पेससूटची नीट तपासणी केली जाते. स्पेससूटमध्ये प्राणवायू भरलेला असतो. तसेच जवळ गती देण्याचे साधन असते. अंतराळवीर प्रथम अंतराळयानाचा पहिला दरवाजा उघडतो. दोन दरवाजांमधील जागेत येऊन पहिला उघडलेला दरवाजा तो बंद करतो. अंतराळयानातील हवा बाहेर न पडण्याची काळजी घेतली जाते. नंतर दुसरा दरवाजा उघडून अंतराळवीर अंतराळयानाच्या बाहेर येतो. नंतर दुसरा उघडलेला दरवाजा बंद केला जातो. अंतराळवीर बाहेर जे काम करायचे आहे त्याची साधने बरोबर घेऊनच बाहेर पडतो. महत्त्वाचे म्हणजे अंतराळवीर आणि अंतराळयान यांच्यामध्ये एक दोरी असते. त्यामुळे तो अंतराळयानाशी कायम जोडलेला राहतो. सुलभ भाषेत सांगायचे तर दोरीचे एक टोक अंतराळयानाला आणि दुसरे टोक अंतराळवीराच्या स्पेससूटला जोडलेले असते.  संदेश यंत्रणा, हवेचा योग्य दाब, शरीराची सुलभ हालचाल, प्राणवायूचा पुरवठा, पाण्याचा पुरवठा, योग्य तापमान इत्यादींची काळजी स्पेससूट घेत असतो. तसेच बाहेरच्या तापमानापासून आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण स्पेससूट करीत असतो. म्हणून स्पेसवॉक करताना स्पेससूट हा जास्त महत्त्वाचा असतो. स्पेससूटला पंक्चर होणार नाही याची दक्षता घेतली जाते. इथे लीकेज होऊन चालणार नसते. वजनरहीत अवस्थेत राहण्याचा शरीरावर काय परिणाम होतो याचा अभ्यास प्रथम करण्यात आला. आता त्यादृष्टीने स्पेससूटमध्येही खूप बदल करण्यात आले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर स्पेसवॉक करताना अंतराळवीर हा पृथ्वीचा जणू कृत्रिम उपग्रहच बनून जातो. स्पेसवॉक करताना अंतराळवीरांना आलेले अनुभव खूप रोमांचकारी असतात. स्पेसवॉक करताना दिलेले काम कमीतकमी वेळात चोखपणे बजावणे हे खूप महत्त्वाचे असते. अपघात होणार नाही यासाठी खूप काळजी घेतली जाते.

भविष्यकाळात ‘स्पेस टुरिझम ’ करता येणार आहे. त्यामध्ये खूपच थ्रिलिंग आहे. मात्र त्यासाठी खूप पैसे मोजावे लागणार आहेत आणि अंतराळात जाणाऱया प्रवाशांना थोडे ट्रेनिंगही घ्यावे लागणार आहे. भविष्यकाळात उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य असणाऱया श्रीमंत माणसांना स्पेस टुरिझम -स्पेसवॉक करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी अनेक लोकांनी तयारीही दाखविली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे विवाह झाल्यानंतर जोडप्याना मधुचंद्रासाठी प्रत्यक्ष चंद्रावर जाणे आणि स्पेसवॉक करणे भविष्यकाळात शक्य होणार आहे.