सोवियतला मागे टाकण्यासाठीच अंतराळात गेलो होतो

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

दुसऱ्या महायुद्धानंतर सोवियत युनियन (युनायटेड स्टेट्स ऑफ सोवियत रशिया) आणि अमेरिकेत शीतयुद्ध सुरू होते. त्यात एकमेकांना मागे टाकण्याची चढाओढ त्या देशांमध्ये होती. सोवियतने १९६१ मध्ये पहिल्यांदा मानवाला अंतराळात पाठवले होते. सोवियतने युरी गागारीन यांना पहिल्यांदा अंतराळात पाठवले होते. त्यानंतर अंतराळ स्पर्धेत सोवियतला मागे टाकण्याची खुमखुमी अमेरिकेला स्वस्थ बसू देत नव्हती. सोवियतने आपल्याला आव्हान दिले आहे, असे समजून अमेरिकेने आठ वर्षांनंतर अपोलो ११ मोहिमेतंर्गत मानवाला चंद्रावर पाठवले. मानवाला चंद्रावर पाठवण्याचा अमेरिकेचा उद्देश नव्हता. तर सोवियतला या स्पर्धेत मागे टाकण्याचा एकमेव हेतू होता असा दावा चंद्राची परिक्रमा करून आलेले अमेरिकेचे अंतराळवीर फ्रँक बोरमॅन यांनी ५० वर्षानंतर केला आहे. सोवियतला मागे टाकण्याच्या हेतूने आपणही या मोहिमेत सहभागी झालो होतो. अंतराळात जाण्याचा कुतुहल काही क्षणच टिकले, त्यानंतर आपला उत्साह मावळला असे बोरमॅन यांनी सांगितले.

चंद्रावर मानवाला उतरवण्यासाठी अमेरिकेने अपोलो मोहिम राबवल्याचे सांगण्यात येते. मात्र, मानवाला चंद्रावर पाठवणे नव्हे तर अंतराळ स्पर्धेत सोवियतला मागे टाकण्याचा अमेरिकेचा उद्देश होता, असे बोरमॅन यांनी सांगितले. १९६८ मध्ये राबवण्यात आलेल्या अमेरिकेच्या अपोलो ८ माहिमेत ते सहभागी झाले होते. अंतराळात जाण्याची उत्सुकता काही क्षणच टिकली त्यानंतर अंतराळात यानात खूप कंटाळा आला होता असे त्यांनी सांगितले. अमेरिकेची अपोलो मोहिम १९६१ ते १९७२ पर्यंत सुरू होती. या मोहिमेत १९६९ मध्ये अमेरिकेने मानवाला चंद्रावर पाठवले होते. बोरमॅन सहभागी झालेल्या अपोलो ८ मोहिमेत अमेरिकेच्या यानाने चंद्राची परिक्रमा केली होती. त्यानंतर आपण मानवाला चंद्रावर उतरवू शकतो असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला होता.

अंतराळयानात खूप आवाज येत होता. प्रयोगासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू यानात होत्या. गुरुत्वाकर्षण नसलेल्या यानातून प्रवास करण्याची उत्सुकता शमल्यानंतर आपण घरी कधी परतू असा प्रश्न सारखा मनात येत होता. या मोहीमेबाबत मी घरी कोणतीही माहिती दिली नव्हती. अपोलो ८ मोहिम २१ डिसेंबर १९६८ रोजी सुरू झाली होती. आमचे यान चंद्राला प्रदक्षिणा घालून परत आले. चंद्रावर मोठमोठे खड्डे आणि डोंगर याशिवाय काहीच दिसत नव्हते. त्यामुळे पृथ्वीवरील सुंदरतेची आठवण झाली, असेही बोरमॅन यांनी सांगितले. अमेरिका आणि सोवियतमधील शीतयुद्धामुळेच अमेरिकेने इर्षेने अपोलो मोहीम हाती घेतली होती असे बोरमॅन यांच्या दाव्यावरून दिसून येत आहे.