गडकरी रंगायतनमध्ये रंगणार दिव्यांग मुलांचा कलाविष्कार

सामना ऑनलाईन, ठाणे

हम भी किसीसे कम नही यारो.. असे सांगत ठाणे जिह्याच्या विविध शाळांत शिकणारी दिव्यांग मुले आपले कलाविष्कार सादर करणार आहेत. स्वयम् बहुविकलांग मुलांच्या पुनर्वसन केंद्राने हा योग जुळवून आणला आहे. दिव्यांग मुलांच्या नृत्य, नाटय़ आणि संगीताची ‘ऊर्जा 2017’ ही अनोखी मैफल 8 ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतन येथे दुपारी 4 वाजता होणार असून या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

स्वयम् बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र ही संस्था गेली 11 वर्षे ठाणे व परिसरातील बहुविकलांग मुले व त्यांच्या पालकांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून  अनेक दिव्यांग मुलांवर विशेष उपचार करण्यात येतात. दिव्यांग मुलेही सर्वसामान्य मुलांप्रमाणे कलागुणसंपन्न असतात. त्यांना आपल्यातील कला सादर करण्याची संधी मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्यातील हे विशेष गुण समाजासमोर यावेत म्हणून स्वयम्च्या संस्थापक संचालक नीता देवळालकर यांनी  दैनिक ‘सामना’च्या सहकार्याने ‘ऊर्जा 2017’ हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. स्पर्धेच्या स्वरूपात होणाऱया या उपक्रमात ठाणे जिह्यातील 20 हून अधिक दिव्यांग मुलांच्या शाळांचा सहभाग असणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता गडकरी रंगायतन येथे होणाऱया एका आगळय़ावेगळय़ा कार्यक्रमात संगीत, गायन, नृत्य, वाद्य, चित्रकला असे विविध कलाविष्कार ही मुले सादर करणार आहेत. व्यक्तिगत व सामूहिक अशा दोन गटांत विद्यार्थ्यांची स्पर्धा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री दिप्ती भागवत करणार आहेत.

अंतिम फेरीसाठी गुणवंतांवर मोहोर  

ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, नवी मुंबई, शहापूर, भिवंडी येथील विविध दिव्यांग शाळांमधील मुलांची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. प्रसिद्ध चित्रकार किशोर नादावडेकर, कला क्षेत्रातील तज्ञ नरेंद्र बेडेकर, विकास फडके, भावना लेले, किरण नाकती इत्यादी परीक्षकांनी प्राथमिक फेरीतून सहभागी कलाकारातील गुणवंत विद्यार्थ्यांची अंतिम फेरीकरिता निवड केली आहे.