World cup 2019 पावसकर, जरा सबुरीने घ्या!

8
फोटो-प्रातिनिधीक

>> माधव गोठोस्कर

यंदाच्या 12 व्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पावसाच्या मोठय़ा व्यत्ययाने जगातील भल्याभल्या संघांच्या तोंडचे पाणी सुरुवातीपासूनच पळाले आहे. सुरुवातीलाच श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तान या संघांतील साखळी लढतींवर पावसाचे पाणी फेरले गेले. या सर्व संघांना रद्द लढतीत 1 गुणावर समाधान मानावे लागले. श्रीलंकन क्रिकेट संघाला तर दोनदा 1-1 गण गमवावा लागला.खरेतर जगातील या क्रिकेटच्या ’शिखर’ विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक लढतीसाठी एक दिवस राखीव ठेवावा अशी अपेक्षा होती. बाद फेरीतील शेवटच्या तीन लढतींसाठी अशी तरतूद करण्यात आली आहे. वाचकांना आठवत असेल, दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेतही पावसाने असाच जोरदार व्यत्यय आणला होता,त्याचाच परिणाम म्हणून ऑस्ट्रेलिया ,दक्षिण आफ्रिका या बलाढय़ संघांना उपांत्य फेरी प्रवेशाला मुकावे लागले होते,असे या स्पर्धेत होऊ नये म्हणून त्या पावसाला साकडे घालावेसे वाटते, पावसकर आता जरा सबुरीने घ्या. वर्ल्डकप स्पर्धा संपली की तुम्हाला बरसायचे तेवढे बरसा.

चार वर्षे विश्वचषकाची प्रतीक्षा करायची ,एक वर्ष आधी आगाऊ विश्वचषक लढतीची तिकिटे बुक करायची आणि पावसाने त्या उत्साहावर पाणी फेरायचे ही क्रिकेटशौकिनांची फसवणूकच नव्हे काय? या लढतींसाठी राखीव दिवस ठेवला असता तर अशा परीक्षकांना हात चोळत घरी परत जावे लागले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. यंदाची स्पर्धा बरीच बाकी आहे. आयसीसीने पुढील स्पर्धेत पावसाने वाया जाणाऱया लढतीचा बेरंग टाळण्यासाठी प्रत्येक लढतीसाठी राखीव दिवस ठेवावा आणि क्रिकेटशौकिनांची फसवणूक आणि निराशा टाळावी एवढीच आम्हा क्रिकेटरसिकांची विनंती आहे.

स्पर्धेत पंचांची कामगिरी अपेक्षेनुसार होताना दिसत नाहीय. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी पंचांच्या कामगिरीबाबत नाराजी बोलून दाखवलीय. विशेषतः नोबॉल आणि पायचीतचे पंचांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. नव्या डीआरएस तंत्राने पंचांच्या अनेक त्रुटी क्रिकेटरसिकांच्या लक्षात आणून दिल्या आहेत. आता आज होणाऱया हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघांतील लढतीत पावसकर व्यत्यय आणणार असे भाकीत इंग्लंडच्या हवामान खात्याने व्यक्त केलेय. परमेश्वर करो आणि पावसाचे ते भाकीत खोटे ठरो एवढीच क्रिकेटशौकीन म्हणून मनोमन इच्छा आहे.

(लेखक हे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या