शॉपिंगला चला…

पूजा तावरे, फॅशन डिझायनर

शॉपिंग म्हटलं की, आपल्याला चकचकीत मॉल्स, बिग ब्रँड्सचे शॉप्स, शॉपिंग सेंटर आठवतात. शहरीकरणाने विविध प्रकारच्या मॉल्सची संख्या शहरात पाहायला मिळते. मात्र याही पलीकडे सगळ्यात अशा काही जागा आहेत ज्या नेहमी गजबजलेल्या असतात… वेगवेगळ्या शॉपिंगकरिता किती मॉल्स किंवा शॉप्स आले तरी स्ट्रीट शॉपिंगसारखी आवडती गोष्ट कुणाची मिस होत नाही. स्ट्रीट शॉपिंग म्हटलं की, तिथे आवडणारी गोष्ट म्हणजे ब्रँडेड वस्तू, स्वस्त आणि मस्त ‘फॅक्टरी मेड’ कॅज्युअल गारर्मेंट्स, ब्रँडेड कपडय़ांच्या, गॉगल्सच्या कार्बन कॉपी अगदी आपल्याला हव्या त्या किमतीत बार्गेन करून घेऊ शकतो. स्ट्रीट शॉपिंग म्हणजे युनिक फॅशन सहज आणि परवडणाऱया दरात उपलब्ध होणे. कितीही मॉल उघडले तरी स्ट्रीट शॉपिंगसारखी मजा कुठेच नाही. मात्र स्मार्टली स्ट्रीट शॉपिंग करणं म्हणजे नेमकं कुठं काय चांगलं मिळतं हे पण माहीत असायला हवंच. स्वस्तात मस्त खरेदी करण्याकडे ट्रेंड सध्या पाहायला मिळत आहे. दुकानदार सांगेल त्या भावात वस्तू खरेदी करणं असं कधी जमणारच नसतं अशा बार्गेनिंग करण्याऱयांसाठी हीच ती योग्य जागा म्हणजे स्ट्रीट शॉपिंग.

स्ट्रीट शॉपिंगसाठी शक्यतो फेमस ठिकाणांवर शॉपिंग करणे पसंत केले जाते. डेनिम टॉप्सपासून ते फुटवेअरपर्यंतच्या सर्व फंकी वस्तू स्ट्रीट शॉपिंगमध्ये पाहायला मिळतात. मग तिथे परर्फ्यूम, बेल्टस्, जंक ज्वेलरी, याशिवाय फंकी ज्वेलरी, एथनिक बोल्ड ज्वेलरी, बॅग्ज,कॉस्मेटिक्स अशा गोष्टी उपलब्ध असतात. फॅशन स्ट्रीटसारख्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत अनोखी व नवी-जुनी फॅशन अनुभवायला मिळते. विविध प्रकारचे टॉप्स, टी शर्ट, वन पीस, स्कर्टस्, कुर्ते, जीन्स यांची लेटेस्ट फॅशन इथे बघायला मिळते. कमी दरात पण उत्तम क्वालिटीचे फुटवेअर इथे दिसतात. घरी घालण्याच्या स्लीपर्समध्येही इथे खूप व्हरायटी आढळते.

सध्या तरुणींमध्ये स्ट्रीट शॉपिंग क्रेझ मॉलपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळेच ती कुठे व कशी करता येईल, लेटेस्ट ट्रेंड कोणता, त्यातील हटके फॅशन कोणती, अशा विविध गोष्टींची माहिती आता तरुणींना सोशल मीडियाद्वारे मिळत आहे. पुणे असो मुंबई स्ट्रीट शॉपिंगचे नवनवे पर्याय तरुणींना शोधण्यास मदत होत आहे. फॅशनेबल कपडय़ांपासून ते फूटवेअरपर्यंतच्या वेगळा लूक देणाऱया आणि परवडणाऱया दरातील या वस्तूंची खरेदी अगदी सहजपणे करता यावी यासाठी तरुणींचा कल स्ट्रीट शॉपिंगकडे झुकताना दिसत आहे. मॉलमध्ये एकाच छताखाली फॅशनेबल लूक देणाऱया सर्व वस्तू मिळतात; पण मॉलमध्ये महाग असल्यामुळे त्यांची खरेदी करणे काही जणींना परवडत नाही.

स्ट्रीट शॉपिंग करताना

  • प्रत्येक दुकानातल्या किमती वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आधी किंमत तपासा आणि खरेदी करा.
  • दुकानदार लगेच बार्गेनिंग करत नाहीत, पण म्हणून तो सांगेल त्या किमतीत खरेदी करू नका.
  • स्ट्रीटवरून कपडे घेताना ते नीट बघून घ्या. डिफेक्टेड असण्याची शक्यता असते.
  • बिनधास्त करा बार्गेनिंग.
  • जिथं जाल त्या जागेविषयी आधीच माहिती काढा.