व्याघ्र पर्यटन, जंगलातून समृद्धी कडे…

562

प्रतीक राजूरकर

पर्यटनाला चालना देण्यासाठी हिंदुस्थानात २५ जानेवारी हा पर्यटन दिवस म्हणून साजरा होतो, २७ सप्टेंबर रोजी साजरा होणारा जागतिक पर्यटन दिवस हा संयुक्त राष्ट्र संघाने नियोजित केलेला आहे, पण गेल्या काही दशकात हिंदुस्थानातील पर्यटनाने देशाच्या महसूलात मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. ऐतिहासिक वास्तू, शिल्प, निसर्गातील विविधतेमुळे हिंदुस्थानचे पर्यटन हा जगात आकर्षणाचा विषय आहे. आपल्या देशातील जैवविविधता हे पर्यटनातील मोठे आकर्षण असून जगात मोजक्या देशात अस्तित्वात असलेला वाघ हा सर्वाधिक संख्येने हिंदुस्थानात आढळतो, जगातील ७०% व्याघ्र संख्या हिंदुस्थानात असल्याने देशाच्या विविध प्रकारच्या वनात वाघांचे अस्तित्व असल्याने देश विदेशातील पर्यटाकांची व्याघ्र पर्यटनात अक्षरशः झुंबड उडते, गेल्या काही वर्षात जंगलात प्रवेशासाठी आॅनलाईन आरक्षणामुळे अनेकदा पर्यटकांना जंगल भ्रमंती साठी प्रवेश सुध्दा मिळत नाही इतकी प्रचंड गर्दी व्याघ्र पर्यटनाला लाभली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७२-७३ साली सुरु केलेल्या ५०० दशलक्ष मूल्याच्या योजनेची आजची व्याप्ती बघता हिंदुस्थानातील ५० पैकी केवळ ६ प्रमुख व्याघ्र प्रकल्पांचे हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत १.२ अब्ज डाॅलरचे योगदान हा सिंहाचा नव्हे तर वाघाचा वाटा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

व्याघ्र प्रकल्पामुळे हिंदुस्थानात परदेशी पर्यटकांची वर्दळ वाढून परकीय चलन चालून येऊ लागले. त्यातूनच अनेक वाघांना जागतिक किर्ती प्राप्त झाली, रणथंबोरची वाघिण मछली, बांधवगडचे वाघ बी-२, चार्जर इत्यादी अनेक वाघांची एक झलक बघण्यासाठी पर्यटक अनेक दिवस पैसे खर्च करुन साता समुद्रापार हिंदुस्थानात येऊ लागले, प्रति वर्षी व्याघ्र पर्यटनातील उत्पन्नाची आकडेवारी ही वाढता वाढता वाढे अशीच आहे, निसर्गनियमाप्रमाणे अनेक प्रसिद्ध वाघ मृत झालेत, पण व्याघ्र पर्यटनात त्याचा काहीच फरक पडला नसून आज रणथंबोर येथील नूर, ताडोबाच्या जंगलातील माया या सारख्या वाघांनी गेलेल्या वाघांच्या स्मृती जागवत आपल्या भोवताल प्रसिद्धीचे वलय कायम ठेवले आहे.

मध्यप्रदेशातील चार व्याघ्र प्रकल्पात २०१६-१७ या काळात पर्यटनातून तब्बल १६६ कोटी रूपयांचा महसूल उत्पन्न झाला आहे. यातील ४५% रक्कम ही स्थानिकांचे उत्पन्नाचा स्त्रोत आहे हे उल्लेखनीय. वनविभागाच्या आकडेवारीवरून केवळ व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रेवश शुल्कातून सर्वाधिक उत्पन्न रणथंबोर व्याघ्र प्रकल्पास २३.०६ कोटी, ताडोबा ५ कोटी, तर बांधवगड ३.०८ कोटी इतके आहे.यावरून व्याघ्र पर्यटनाच्या श्रीमंतीचा अंदाज येऊ शकतो. वाघांमुळे वनांचे संरक्षण होतेच पण त्याच बरोबर व्याघ्र प्रकल्पाबाहेरील गावात वीज, रस्ते, रोजगार इत्यादिं सारख्या विकासाच्या संधी सुध्दा आल्या आहेत ही वाघाची वन्यप्राणी असून सुध्दा मनुष्यप्राण्यास दिलेली भेट आहे. वाघांचे प्राचीन काळापासूनचे  नैसर्गिक, धार्मिक, साहित्यिक वास्तव्य हा ऐतिहासिक  वारसा असून त्याचा १२ हजार वर्षांचा प्रवास अधिक समृध्द  होऊन त्याची आजची झेप ही जागतिक, आर्थिक आणि सामाजिक वारसा म्हणून नावारूपास आली आहे.

व्याघ्र पर्यटनात विविध व्याघ्र मुद्रांचे दर्शन होत असत, कधी सावजाला टप्प्यात घेतांना, कधी डौलात रस्त्याच्या मधोमध चालतांना तर कधी  अनेकांना ताटकळत ठेवून अखेर पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत सर्वां देखत २०-२५ जिप्सींच्या गराड्यातून कुणाचीही दखल न घेता दिमाखात मार्गक्रमण करणारा वाघ पर्यटकांच्या ह्दयाच्या धडधडी पेक्षा अधिक वेगाने कॅमेऱ्यावर चालणारी बोटे टिपण्यास आतुर झालेली, सर्व वयोगटातील पर्यटकांना आपली दखल घेण्यास भाग पाडून जंगलात दृष्टीआड होतात आपल्या बघण्यास पर्यटक येतात ह्या अभिमानचा वाघांच्या भारदस्त चेहऱ्यावर लवलेश पण आढळत नाही अथवा आपल्या एका दर्शनाने आपण कितीतरी लोकांच्या आनंदाचे कारण झालो आहे या पासून पूर्णतः अनभिज्ञ, न कुठला द्वेष न कुणाचा मत्सर, आपण कुणाला ताटकळत ठेवले आहे? याचे सोयरसुतक नाही वाघांसाठी व्यावसायिक, कोट्याधीश, सरकारी अधिकारी नौकरदार सारेच अतिसामान्य, सर्वच समान कुणाची वेगळी रांग नाही कुणाला विशेष दर्जा नाही त्यांच्या लेखी ते केवळ मनुष्यप्राणी सर्वांना समानतेची वागणूक देऊन वाघांचे काही क्षणांच्या दर्शनाने अनेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या जंगलात मावत नाही पण या सर्वांची वाघांना न तमा न पर्वा न भिती, लहनांपासून तर वृध्दां पर्यंत सर्वांच्याच स्मृतीत कायमची बंदिस्त, वलयांकित आयुष्य काय असतं ते वाघांच्या काही क्षणांच्या दर्शनाने स्पष्ट होत पर्यटकांच्या मज्जातंतूंना नर्व्हस न करता व्याघ्र दर्शनाने पर्यटकांना काही आनंदाचे क्षण प्राप्त होतात, आपल्या व्याधी, वय, जबाबदाऱ्या हे सगळे विसरायला भाग पाडतात.

बांधवगड
मध्यप्रदेशातील उमरिया जिल्ह्यात चहुबाजूंनी वेढलेल्या पर्वतीय प्रदेशाच्या मधोमध वसलेले हे जंगल जणू वाघांचे नंदनवनच, पावसाळ्यात पर्वतांवरुन उतरणाऱ्या पाण्यामुळे भर उन्हाळ्यात देखील इथल्या जंगलावर हिरवळ आढळते,  गडद वनराईने व्याप्त हे जंगल  वाघांचे दर्शन होण्याची सर्वाधिक शक्यता म्हणून पर्यटकांचे आवडते म्हणूनच लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान आहे, ताला, खितौली, मगधी अशा ७१६ चौ.कि.मी परिसरातील तीन भागात विभागलेला हा व्याघ्र प्रकल्प भौगोलिक दृष्टीने लहान अाहे तिन्ही विभागात भरपूर वाघांची संख्या अाहे. पर्यटकांसाठी यातील १०५ चौ.कि.मी चा भाग पर्यटनासाठी खुला आहे, त्यात ४० च्या वर वाघांची संख्या अाहे. याशिवाय बांधवगडला पौराणिक, ऐतिहासिक परंपरा आहे, अनेक मंदिर, पुरातन गुहा,किल्ल्याचे अवशेष इथल्या जंगलाच्या वैभवात अधिकच भर घालतात. इथल्या पर्वतारांगेत शेषशय्येवरील विष्णूची भव्य मूर्ती ही पर्यटनासोबत तीर्थाटनाचा सुध्दा आनंद देणारी आहे. बांधवगडचा किल्ला हा प्रभू श्रीरामांनी बंधु लक्ष्मणास दिल्याची सुध्दा मान्यता आहे.

ताला विभागात स्पाॅटी नाव दिलेली वाघिण तीन बछड्यांसह हमखास “स्पाॅट” होत असल्याने आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, शिवाय तिचीच बहिण डाॅटी ( टी-१७) ही मगधी परिसरात दिसून येते, या व्यतिरिक्त बमेरा सन (टी-३७ हा इथल्या लोकप्रिय बमेरा भागातील वाघाचा मुलगा म्हणून हे नाव प्रचलित झाले आहे), याचा मगधी परिसरात प्रभाव आहे, पर्यटकांच्या वाहनाच्या अगदी जवळून निर्धास्तपणे वावरणारा म्हणून याची ख्याती असल्याने याचे भरपूर छायाचित्र काढता येतात, त्यामुळे पर्यटकांना याचे दर्शन म्हणजे पर्वणीच असते. या शिवाय  खितौली विभागातील भिम ( टी-२२),  ताला-मगधी विभागतील मंगू (टी-९), मगधी विभागातील महामन (टी-३९) हे युवास्थेतील वाघ बिनदिक्कतपणे वाहनांच्या समोर दूर दूर पर्यंत चालून अथवा रस्त्याच्या कडेला बसून आपले वाघपण दाखवत असतात, म्हणून व्याघ्र पर्यटनात बांधवगडला देशी व परदेशी पर्यटकांची सर्वाधिक पसंती आहे. जंगलाच्या तुलनेत भरपूर प्राणी व वाघांची संख्या या जंगलाचे वैशिष्ट्य आहे, म्हणून बांधवगडला व्याघ्र दर्शन न होणे ह्याची शक्यता फारच कमी म्हणूनच पर्यटकांना व्याघ्र पर्यटनाचा ‘पैसा वसूल’ असे हे एक उत्तम पर्यटन क्षेत्र. वाघांची वर्दळ असलेल्या या जंगलात पुणेरी पाटी इतकीच एक महत्वाची पाटी आपले लक्ष वेधून घेते, त्यावर लिहिले आहे काळजी करु नका आपणांस जरी मी दिसलो नसलो तरी मी आपणांस बघितले आहे अशी वाघाची पुणेरी बाण्यातली सांत्वना वाघ न दिसलेल्यांना न दिसलेल्या वाघांचे मात्र कौतुक करवून घेते.

रणथंबोर
राजस्थान येथील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील वाघिण “मछली” निसर्गाने अपवादात्मक परिस्थितीत मछलीला जवळजवळ २० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य बहाल केले जे वाघांच्या नैसर्गिक आयुष्यात असामान्य आहे, २०१६ आॅगस्ट महिन्यात मछली मरण पावली  दोन दशके मछलीने वन्यजीव प्रेमींच्या ह्दयावर राज्य करुन अापल्या दर्शनाने अनेक पर्यटकांचे व्याघ्र पर्यटन सार्थकी लावले. लेडी आॅफ लेक,  १९९६-९७ साली ही वाघिण जन्माला आली आणि पुढे २०१६ पर्यंत मछलीची लक्ष्मीरुपातील पावले रणथंबोरच्या जंगलात उमटली आणि अनेकांना मछलीच्या या लक्ष्मी रुपाचे दर्शन झाले आहे, थोडेथोडके नाही तर तब्बल दहा दशलक्ष डाॅलर मूल्याचा  कुबेराचा खजिना मछलीने देशाला आणि राज्य सरकारला मिळवून दिला. तिचे छायाचित्र असलेले टपाल टिकीट शासनाने तिच्या आर्थिक आणि वसुंधरेतील योगदान म्हणून २०१३ साली सुरु केले, शिवाय पर्यटकांचे आकर्षण आणि देशाच्या उत्पन्नात लक्षणीय भर घातल्याबद्दल ट्रॅव्हल आॅपरेटर्स फाॅर टाईगरचा जीवन गौरव सन्मानाने गौरवांकित झालेली वाघिण ठरली. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरल्यामुळे सहाजिकच जगातील सर्वात जास्त छायाचित्र काढण्यात आलेली वाघिण म्हणून ती अग्रस्थानी आहेच या व्यतिरिक्त अॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी या वाहिन्यांनी मछलीवर ५० मिनिटांचा “टाईगर क्वीन” माहितीपट प्रदर्शित केला आहे, तर २०१२ साली बी बी सीच्या नॅचरल वर्ल्डच्या भागात ” क्वीन आॅफ टाईगरस” नावाने माहितीपट प्रदर्शित झाला आहे. वास्तविक नर वाघाचे जंगलातील प्रदेशात राज्य असते, पण वाघिण असूनही सलग १२ वर्षे जंगलातील सर्व वाघांना समर्थपणे तोंड देऊन मछलीने अधिराज्य केले हे व्याघ्र कुळातील असामान्य आणि एकमेव उदाहरण असावे, २००३ साली १४ फुट मगरी समवेत लढतांनाचा तिचा व्हिडिओ आजही इंटरनेट वर उपलब्ध आहे, त्यात मछलीचे दोन दात पडले होते, मछली आपल्या अलौकिक शौर्यामुळे आजही अनेकांच्या चर्चेचा विषय आहे, आर्थिक, शौर्य, पराक्रम या व्यतिरिक्त मछलीने व्याघ्र संवर्धनात मोठे योगदान दिले आहे जे तीच्या श्रीमंतीत अधिक भर घालणारे आहे, १९९९-२००६ या सात वर्षात अकरा बछड्यांना जन्म दिला, त्यातील सात वाघिणी तर चार वाघ आहेत, सर्वसाधारणपणे वाघिणीचे दोन ते तीन वेळा प्रजनन होत असते पण मछलीचे चार वेळा प्रजनन झाले ही व्याघ्र कुळातील असामान्य बाब आहे, पण तिच्या संवर्धनातील योगदानामुळे रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील २००४ साली वाघांची संख्या १५ वरुन २०१४ साली ५० वर गेली, रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील निम्मे वाघ हे तीच्या गोत्रातील आहेत, आॅगस्ट २०१६ साली तिचे वृध्दपकाळाने निधन झाले जंगालातील वाघांचे सामान्य आयुष्य हे १०-१५ वर्षे आढळते पण मछलीने जवळजवळ २० वर्षे जगून त्याला पण अपवाद ठरली अखेर हिंदू रितीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, रणथंबोरच्या, पर्यटनाला संवर्धनाला  मछलीच्या पायगुणांनी कुबेराचा खजिनाच लाभला. मुळात वाघांना ओळखण्यासाठी वनविभागा मार्फत क्रमांक दिले जातात पण पर्यटक, वन्यजीव अभ्यासक अथवा स्थानिक त्यांना साजेशी नावे देत असतात, लेडी आॅफ लेक, क्वीन मदर आॅफ टाईगरस, टाईगरेस क्वीन आॅफ रणथंबोर या सारख्या नावांनी तिचे जगभरातील पर्यटकांनी बारसे केले, मुळात वाघांना ओळखण्यासाठी वनविभागा मार्फत क्रमांक दिले जातात, टी-१६ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीला तिच्या चेहऱ्यावरील मतस्याकृती खूणेमुळे मछली हे नाव देण्यात आले व तेच प्रचलित झाले. थोडक्यात वाघ जंगलाचा राजा म्हणून प्रचलित आहे पण मछली वाघिण जंगल की रानी म्हणून नावरुपास येऊन आपली स्वत:ची ओळख प्रस्थापित करुन गेली. मछली आज रणथंबोरच्या जंगलात नसली तरी तिची पुढली पिढी आज पर्यटकांचे आकर्षण ठरली आहेत, टी- २६ शर्मिली, उस्ताद, टी-२५ डाॅलर किंवा जालीम, टी ३९ नूर या सारखे अनेक वाघ आज मछलीची कमी भरून काढताहेत. सुदैवाने गेल्या दोन वर्षात रणथंबोरला २८ वाघांनी नव्याने भर घातली आहे.

ताडोबा
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला १९९३ साली मान्यता मिळाली ६२५ चौ कि.मी प्रदेशात वसलेल्या ह्या वनप्रदेशात आज ८० च्या आसपास व्याघ्र संख्या आहे, वाघांचे दर्शन सहज साध्य असलेल्या ह्या व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओढा आहे, उन्हाळ्यात हमखास व्याघ्र दर्शन होईल अशी ख्याती असलेल्या व्याघ्र प्रकल्पात सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर माया नावाची वाघिण आणि तिचे बछडे आहेत, ताडोबातील पांढरपवनी परिसरात वाहन, पर्यटक, रस्ता कशाचीही पर्वा न करता आपल्या प्रदेशात मुक्तपणे वावरणारी ही वाघिण अनेक वर्षांपासून आपला प्रभाव ठेऊन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. वाघडोह नावाने प्रसिध्द असलेला वाघ हा देशातील आकाराने सर्वात मोठा वाघ असल्याचा स्थानिकांचा दावा आहे, त्याचे दर्शन झाल्यावर त्यांच्या दाव्यात तथ्य असल्याची खात्री पटते.
तारा वाघिणीची मुलगी म्हणून छोटी तारा नावाची वाघिण ही तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास तिला वनविभागाने लावलेल्या काॅलर मुळे लवकर लक्षात येते, प्रकल्पातील जामनी परिसर हिचे प्रभाव क्षेत्र आहे.सोनम वाघिण तिच्या उजव्या गालावरील इंग्रजी अक्षर S असल्यामुळे सर्वांच्या परिचयाची आहे, ताडोबा संरक्षीत वन क्षेत्राला लागूनच अनेक विश्रांती गृह आहेत, अनेकदा व्याघ्र गर्जनेने रात्री अपरात्री पर्यटाकांच्या विश्रांती या व्याघ्र गर्जेनेने सार्थकी लागते.

काॅर्बेट
हिंदुस्थानातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून काॅर्बेट राष्ट्रीय उद्यान म्हणून परिचित आहे, शिवाय देशातील सर्वाधिक व्याघ्र संख्या असलेला व्याघ्र प्रकल्प म्हणून सुध्दा काॅर्बेट राष्ट्रीय उद्यानाची ख्याती आहे, प्रसिध्द जिम काॅर्बेट यांच्या नावाने असलेल्या व्याघ्र प्रकल्पात आज २०० हून अधिक वाघांचे अस्तित्व आहे. उत्तराखंड मधील नैनीताल, पौरी, अलमोरा जिल्ह्यातील १२८८ वनक्षेत्रात विस्तारलेला हा व्याघ्रप्रकल्प हिमलयाच्या सान्निध्यात असल्याने या व्याघ्र प्रकल्पाचे सौंदर्य अनन्यसाधारण असेच आहे. पर्यटनासाठी बिजरानी, झिमा, दुर्गादेवी, ढिकाला, सोनानदी, ढेला या सहा भागात हा व्याघ्र प्रकल्प विभागलेला आहे. देवभूमी म्हणून नावलौकिक असलेली उत्तराखंड भूमी ही सर्वाधिक संख्येने वाघांचे अस्तित्व असलेली व्याघ्र भूमी म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे, काॅर्बेट व्याघ्र प्रकल्प हा अजून प्रसिद्ध आहे ते तिथल्या वन्यजीवांच्या विविधतेसाठी, हत्ती, गेंडा या सारख्या वन्यजीवांनी काॅर्बेटच्या जैवविविधतेत अधिकच भर घातल्याने काॅर्बेट व्याघ्र प्रकल्प हा सर्वांगाने जगभरातील पर्यटकांची विशेष प्राथमिकता असते. इथल्या ढिकाला संरक्षीत वनक्षेत्रांतर्गत असलेले विश्रामगृहात आरक्षण मिळण्यासाठी पर्यटकांची धडपड असते, कारण जंगलातील अनेक थरारक अनुभव इथे घेता येऊ शकतात, ढिकाला क्षेत्रातील पर्यटकांचे अनुभव इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेने अधिक उत्कंठा वाढविणारे आहेत.

या व्यतिरिक्त उत्तरप्रदेशातील दुधवा, आसाम राज्यातील काझीरंगा इथला काही वर्षापूर्वीचा वाघिणीचा हत्तीवर झेप घेऊन माहुताला जखमी करणारा व्हिडिओ इंटरनेटवर प्रसिद्ध आहे, दक्षिण हिंदुस्थानातील कर्नाटकात बंदिपूर, नागरहोल, कान्हाकिसली, पेंच, नवेगाव नागझिरा सारखी अनेक व्याघ्रप्रकल्प आपल्या लक्षणीय व्याघ्र संख्येने पर्यटकांचे आकर्षण ठरले आहेत. देशभरातील ५० व्याघ्रप्रकल्पात आज अडीच ते तीन हजारच्या आसपास वाघ आहेत. प्रत्येक व्याघ्रप्रकल्पाची भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक  विविधता असली तरी त्यातले प्रमुख आकर्षण व्याघ्र पर्यटनच आहे ह्यात कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. व्याघ्र पर्यटनातून देशाच्या महसूलात प्रचंड योगदान झाले आहे, होतं आहे. या व्यतिरिक्त स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याने अवैध शिकारीला ७०% आळा बसल्याचा अभ्यासकांचा दावा आहे, अनेक योजना, रोजगाराच्या संधी अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचे साधन, अनेक गावांचा विकासाला वाघांच्या अस्तित्वाने प्रगती साध्य करता आली. पर्यटन क्षेत्रात देशातील केवळ ३०-३५% वाघांचे अस्तित्व असून उर्वरित ६५-७०% वाघ हे पर्यटन क्षेत्राबाहेर आहेत ज्यांच्या सुरक्षेचा गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे कारण वाघ हे पर्यटन, संरक्षीत अतिसंरक्षित क्षेत्राबाबत अनभिज्ञ आहेत म्हणून वाघांचे संवर्धन हे पर्यटनापुरते मर्यादित असू नये. सामान्य माणसाच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात वाघांनी समृद्धी आणली आहे ह्याचा विसर पडू नये, व्याघ्र पर्यटनाची आणि पर्यायने वाघांचे आणि इतर वन्यजीवांचे हे योगदान मान्य करावेच लागेल. वन्यजीवात निसर्गाने वाघाला जैवसाखळीत सर्वोच्च स्थानी विराजमान केले आहे, त्याच व्याघ्र पर्यटनाने अनेक कुटुंबांची चूल पेटवून सामाजिक स्तरावर समृद्धी आणून आपले सामाजिक दायित्व सुध्दा सिद्ध केले. व्याघ्र पर्यटनातून अनेक कुटुंबात लक्ष्मी अवतरल्याने लाखो लोकांच्या आयुष्यात समृद्धी आली आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. जंगलातून सुरु होणारे व्याघ्र पर्यटन सामाजिक समृद्धीकडे नेणारे आहे हे कुणी नाकारू शकणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या