जे.जे.मधील हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या निमित्ताने…

9

<<डॉ. कृष्णराव भोसले>>

मानवी शरीरात बरेचसे अवयव आहेत, त्यातील निवडक अवयव एका क्यक्तीच्या अंगातून काढून ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात बसवणं… त्याला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हटलं जातं. मग यात मूत्रपिंड, यकृत, हृदय अशा काही खास अवयवांचेच प्रत्यारोपण करणं शक्य असतं. सरकारी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण होतं, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होतात. पण आजघडीला हृदयाचं प्रत्यारोपण कुठल्याच सरकारी रुग्णालयांत होत नाहीय. जे.जे.मध्ये ते करता यावं यासाठी आता तयारी सुरू झाली आहे. ही पूर्वतयारी म्हणजे या शस्रक्रियेसाठी लागणारे ऑपरेशन थिएटर, बाकीची यंत्रसामुग्री, आयसीयू व्यवस्था ही तयारी जे.जे.मध्ये आता सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यांत ही तयारी पूर्ण होईल. सर्वसामान्य लोकांना चांगले उपचार मिळावेत यासाठीच हे सगळे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून आलेल्या रुग्णांना या सुविधेचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच जे.जे. हॉस्पिटलचा उद्देश आहे.

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सहज होतात. इतर रुग्णालयांत त्या होत नाहीत, याचं कारण म्हणजे अशा प्रकारचं ऑपरेशन करण्यासाठी अनेक प्रकारच्या परवानग्या लागतात. आरोग्य सेवा संचालकांच्या परवानग्या मोठमोठ्या हॉस्पिटल्सना मिळालेल्या आहेत. त्या मिळाल्यावरच कोणत्याही हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता येते. इतर रुग्णालयांमध्ये एकदा त्या परवानग्या मिळाल्या की तेही शक्य होईल. जे.जे. किंवा के.ई.एम.सारखी रुग्णालये सुसज्ज, आधुनिक असतात. पण ती सर्कसामान्य लोकांसाठीही फायद्याची ठरावीत असाच त्यांचा उद्देश असतो. आता हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारी जे.जे. ही पहिलीच पब्लिक संस्था ठरणार आहे. त्याचा गरीब आणि महाराष्ट्रातील मागासलेल्या लोकांना नक्कीच फायदा होणार आहे.

हृदय हा आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचा अवयव आहे. तो नीट सांभाळावा लागतो. ज्याला वैद्यकीय भाषेत रिस्क फॅक्टर म्हटलं जातं. हृदयाचे आजार टाळण्यासाठी घेतली जाणारी काळजी म्हणजे रिस्क फॅक्टर्स असतात. यात ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं मानलं गेलंय. बीपीसुद्धा योग्य तेवढाच असला पाहिजे. स्थूलपणा कमी करायला हवा. स्मोकिंगपासून माणसाने दूर राहायला हवं… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताणतणावाची जीवनशैली टाळणं गरजेचं आहे. यामुळे हृदयाचं आरोग्य टिकवायला मदत होते.

शस्रक्रियेची वेळच का येते?

माणसाला जन्मापासूनच वेगवेगळे अवयव मिळालेले असतात. पण काही आजारांमुळे म्हणा किंवा अपघाताने म्हणा यातील काही अवयव निकामी होतात. पण त्या अवयवांचं काम शरीराला गरजेचं असतं. त्यात युरीन असो, लिव्हर असो किवा हृदय असो… हृदयाबाबत एक खास बाब अशी असते की कोणत्याही जिवंत माणसाचं हृदय काढून दुसऱयाला बसवलं जात नाही. बसवताच येत नाही. ज्या व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केलेलं असतं त्या माणसाचंच हृदय दुसऱया माणसाच्या शरीरात बसवता येतं. रुग्णाच्या शरीरातील हृदयाचं काम २० टक्क्यांनी कमी झालेलं असतं आणि कुठल्याही उपचाराने ते बरं होण्यासारखं नसलं तर हृदय प्रत्यारोपण शस्रक्रिया करावी लागते. तीही रुग्णाचं वय लक्षात घेऊनच… वयाच्या ६५ वर्षांपर्यंतच्या रुग्णांना हृदय बदलण्याची शस्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाते.

काळजी काय घ्यायची?

हृदय प्रत्यारोपण शस्रक्रिया झालेल्या रुग्णांनी शस्रक्रियेनंतर बरीच काळजी घेतली पाहिजे. त्यांना वेगवेगळी औषधं चालू ठेवावी लागतात. त्याला जो अवयव बसवलेला असतो त्या अवयवाने रिजेक्शन करू नये यासाठी विविध औषधे लागतात. नवे हृदय नीट काम करायला लागण्यासाठी काही खास औषधे घ्यावी लागतात. इन्फेक्शन होऊ नये यासाठीही ही औषधे असतात. या सगळ्याला आमच्या वैद्यकीय भाषेत सपोर्टिव्ह ट्रीटमेंटचा भाग म्हणतो तो असतो. अशा प्रकारच्या ज्या शस्रक्रिया आहेत त्यात रुग्णाची निवड आणि ऑपरेशननंतरची त्याची वैद्यकीय मॅनेजमेंटची बाजू यासुद्धा तेवढय़ाच महत्त्वाच्या आहेत. यासाठी रुग्णाने काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लावलेला अवयव दीर्घकाळ काम देत राहायला पाहिजे हा उद्देश असतो.

आपली प्रतिक्रिया द्या