एक वेगळा प्रयत्न

3

येत्या सोमवारी ५ जून रोजी होणाऱया पर्यावरण दिनानिमित्त सर्पमित्र भरत जोशी यांनी ब्रेल लिपीतून पर्यावरणाचे दर्शन घडविले आहे. ‘हरित पर्यावरण दर्शन’ या त्यांच्या २५ पानी ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा सकाळी १० वाजता होणार आहे.

अंधबांधवांसाठी सर्पमित्र भरत जोशी गेल्या २५ वर्षांपासून ब्रेल लिपीत पुस्तके लिहीत आहेत. यातले पहिले पुस्तक आहे ‘सर्पस्पर्श’. यात एखाद्या अंध व्यक्तीला सर्पदंश झाला तर त्याने प्रथमोपचार कसे करायचे? यावर विवेचन करण्यात आले आहे. अंध व्यक्तींनी ‘सर्पस्पर्श’ हे पुस्तक अतिशय चांगले आणि उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे. दुसऱया ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ नावाच्या पुस्तकात आग, बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले झाल्यावर अंधबांधवांनी कसं वागावं या दृष्टीने त्याची माहिती ठिपक्यांच्या सहाय्याने सांगण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यात एके-४७ रायफल आणि बंदुकीची गोळी नेमकी कशी असते तेही ठिपक्यांच्या सहाय्याने वर्णन करण्यात आले आहे. यामुळे अंधबांधवांना स्पर्शज्ञानाने रायफल, गोळी म्हणजे काय ते कळू शकते. त्यातच डोळस माणसांनी अंध बांधवांना कशी मदत करावी तेही स्पष्ट करण्यात आले आहे. महिनाभरापूर्वीच या पुस्तकाचं प्रकाशन ३०० अंध बांधवांसमोर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. जोशी यांचं अंध व्यक्तींसाठी असलेलं तिसरं पुस्तक म्हणजे ‘स्वावलंबी अंधमित्र’. यात त्यांनी योगासनांबद्दल माहिती दिली आहे. अंध व्यक्तींनी आपले शरीर सुदृढ कसे ठेवायचे हे सांगतानाच त्यांनी योगासनांचा वापर कसा करावा याबाबतचे विवरण देण्यात आले आहे. ठिपक्यांच्या सहाय्यानेच त्यांनी पद्मासन घालून कसे बसायचे, याची चित्रेही दिली आहेत. अंध, अपंग, गतीमंद, कर्णबधिर यांना शासनाकडून कोणकोणत्या सोयीसुविधा पुरवल्या जातात, त्यांच्यासाठी कोणते कायदे आहेत तेही सविस्तरपणे देण्यात आलंय.

पर्यावरणाची परिपूर्ण माहिती

भरत जोशींच्याहरीत पर्यावरण दर्शनया नव्या पुस्तकात पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण कसे राखावे? जल, वायू आणि जमीन पर्युषणातील दुष्परिणाम सांगितलेले आहेत. पर्यावरण आणि मनुष्य यांचे नाते आणि त्यांचे महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन कसे करावे याचे माहितीपूर्ण आणि शास्रीय विवरण या पुस्तकात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या पुस्तकात पर्यावरणातील चार मुख्य घटकही विस्तृतपणे देण्यात आले असून पर्यावरणावर आता खूप गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे, असेही भरत जोशी यांनी या पुस्तकात नमूद केले आहे.

advt