साजरी करा पक्वान्नांची होळी

शेफ मिलिंद सोवनी

होळी साजरी करायची म्हणजे पुरणपोळी हवीच. याशिवायही पाहूया काही मजेशीर पदार्थ

 होळी उत्तर हिंदुस्थानात होळीला आपल्यापेक्षा जास्त महत्त्व असतं. महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी केली जाते, पण होळी असं काही विशेष मानलं जायचं नाही. होळीला आपल्याकडे जास्त महत्त्व आहे ते रात्रीच्या ‘होलिकादहन’ला… या रात्री साधारणपणे प्रत्येक मराठी माणसाच्या घरात पुरणपोळी बनवतात. त्या दिवशी आणि दुसऱया दिवशी ती खाण्याची परंपरा आपल्याकडे आहे. पण होळीच्या दिवशी उत्तर हिंदुस्थानात जसं रंगात डुंबून जाण्याचा प्रकार केला जातो तो आपल्याकडे त्या दिवशी नसतो.

उत्तर हिंदुस्थानातही होळीचा सण उत्साहात साजरा होतो, पण तिकडे पुरणपोळीसारखे खायचे विशिष्ट असे पदार्थ त्या दिवशी बनवत नाहीत. कारण त्यांचा होळीचा दिवस दंगामस्ती आणि खेळण्यात जातो. या खेळात घरातले सगळेच जण मग ते लहान असो की मोठे, सगळेच सामील होतात. त्यामुळे त्या दिवशी साग्रसंगीत असं जेवण वगैरे बनवायला त्यांना वेळच नसतो. मग तेथे बऱयाच ठिकाणी आलेल्या पाहुण्यांना थंडाई देणं, ब्रेड पकोडे किंवा भांगेची पाने घातलेले पकोडे दिले जातात. तेथे भांगेचं खूप मोठं फॅड आहे. भांगेची पानं वाटून पकोडय़ांमध्ये घातली जातात. त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची नशा येते. त्यामुळे होळी हा सण तिकडे रौद्ररूप धारण केलेला असाच मानला जातो.

अगदी पूर्वीपासून तिकडे होळीला विशेष असा कोणताच पदार्थ बनवायची प्रथा नव्हतीच. मिठाया बाहेरून आणतात. तिकडे माव्याची मिठाई खूप आवडीने खाल्ली जाते. भुजिया  हा प्रकार आधीपासून बनवून ठेवता येतो. बनवला की साधारण दोन ते तीन दिवस तो पदार्थ आरामात राहू शकतो. त्यामुळे तेथे होळीच्या आदल्या दिवशी भुजिया बनवतात. अलिकडे तोही घरी बनवण्याचं बहुतांश बंद झालंय. वेळ कुणाला आहे? जे काही हवं ते बाहेर तयार मिळत असताना कोण मेहनत घेऊन घरी बनवणार? पण भुजिया हा त्या मानाने होळीमध्येच तिकडे बनणारा खास पदार्थ आहे असं म्हणता येईल. आपल्याकडे जसं पुरणपोळी म्हणजे होळीलाच, असं म्हटलं जातं तसं तिकडे भुजिया नाही. तेथे तो फक्त होळीला नाही, तर कधीही बनवला जातो. पण पकोडे आणि थंडाई हे पदार्थ तिकडे खास होळीलाच बनतात.

थंडाई

साहित्य.. दूध अर्धा लिटर, साखर दीड चमचा, केशर ६ ते ८ काडय़ा, रोझ इसेन्सचे काही थेंब. (पेस्टसाठी)२० बदाम, खसखस १ चमचा, बडीशेप एक चमचा, हिरवी वेलची पावडर पाव चमचा, १० काळीमिरी.

कृती… सर्वप्रथम मसाल्याचे सर्व पदार्थ करून पाण्यात भिजवून ठेवायच्या. त्यादरम्यान दूध उकळून घ्यायचे. दूध थंड झाल्यावर त्यात साखर मिसळा. कोमट दूध एक चमचा घेऊन त्यात केशर मिसळायचे. मग ते साखर घातलेल्या दुधात टाकायचे. बदामाची साले काढून ते कुटून घ्यायचे आणि मसाल्याच्या पदार्थांच्या पावडरबरोबर त्याची पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर ते मिश्रण चांगले ढवळून दुधात घालायचे. चांगले एकजीव झाले की सेट होण्यासाठी बाजूला ठेवायचे. किमान १५ मिनिटांनी ते चांगले सेट होते. मग त्यात राहिलेले केशर-दूध मिसळून घ्यायचे. मग त्यात दोन थेंब रोझ इसेन्स टाकायचा आणि फ्रिजमध्ये थंड व्हायला किमान तासभर ठेवायची. ही थंडाई खूप थंड झाल्यावरच खायची.

-पुरणपोळी

साहित्य (पुरणासाठी) १ कप चणा डाळ,१ कप गूळ, पाव चमचा वेलची आणि जायफळ पावडर, १ कप पाणी. (पीठ मळण्यासाठी) १ कप गव्हाचे पीठ, अर्धा कप मैदा, १ चमचा तेल आणि चवीपुरते मीठ.

कृती सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावी. शिजलेली चणाडाळ चाळणीवर घेऊन पाणी काढून टाकावे, नंतर त्यात गूळ घालून शिजवावी. शिजल्यानंतर ती वाटावी. त्यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालावी. पुरणपोळीसाठी पुरण तयार झाले. त्यानंतर कणिक आणि मैद्यामध्ये १ चमचा तेल आणि चवीपुरते मीठ घालून कणिक सैलसर भिजवावी. १ तास ही मळलेली कणिक मुरण्यासाठी ठेवावी. एक तासानंतर वाटलेले पुरण हाताने सारखे करून घ्यावे. कणकेचा छोटा गोळा हातावर घेऊन साधारण कणकेच्या गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरण घेऊन हलक्या हाताने ते हळूहळू कणकेत भरावे आणि तो कणकेचा गोळा हाताने बंद करावा. पोळपाटावर पीठ घेऊन हलक्या हाताने पुरणपोळी लाटावी. मंद आचेवर तव्यावर भाजावी. अशाच पद्धतीने सर्व पोळ्या कराव्यात. पुरणपोळीला वरून तूप लावून वाढावी.