सच्चा रंगकर्मी : प्रदीप पटवर्धन


क्षितिज झारापकर << [email protected]>>

का मातब्बर कलाकाराशी गप्पा मारायच्या होत्या. त्याला म्हटलं मला तुझा नंबर दे. म्हणाला घे. अमुकतमुक अमुक, तमुक वन वन वन वन वन. थोडक्यात, बघ वणवण अजून चालूच आहे. एका अर्थाने हीच खऱया कलाकाराची ओळख आहे. शुद्ध रंगकर्मीची कलेकरता चालू असलेली वणवण कधीच संपत नाही. असा हा कलेसाठी सदोदित वणवण करणारा रंगकर्मी प्रदीप पटवर्धन. त्याच्याशी त्याच्या नवीन नाटकाच्या ‘आली तर… पळापळ’ या नाटकाच्या निमित्ताने झालेल्या गप्पा.

व्यावसायिक रंगभूमीवर शिरकाव करणं कठीण आहे असं आजही तरुण रंगकर्मी म्हणतात. तू इथे कसा शिरलास?

कॉलेजात असताना स्पर्धा करत होतो. नाटकांचं खूप वेड होतं. गिरगावात राहतो… आजही. तेव्हा साहित्य संघात पिटात बसून नाटकं पाहायचो. तेव्हाचे स्पर्धा परीक्षक पुरू बर्डेंनी माझं काम पहिलं होतं आणि प्रथम ‘टुरटुर’मध्ये मला मद्राश्याचा रोल दिला. ते नाटक म्हणजे आमची नाटकाची युनिव्हर्सिटी होती. मी तिथे ग्रॅज्युएशन म्हणजे काही प्रयोगात विजय कदम यांची भूमिकाही करायचो.

म्हणजे ज्या नाटकाने मराठीला अनेक स्टार दिले त्यातला तू एक स्टार…

कलाकार… ‘टुरटुर’मधले आम्ही सगळे उत्तम कलाकार होतो. स्टार मायबाप प्रेक्षकांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. एका रात्रीत स्टार झालेले दुसऱया दिवशी शून्य झालेले अनेक उदाहरणं आहेत. नाटक हे एक असं माध्यम आहे की, जिथे तुमचं टॅलेण्ट तावूनसुलाखून ताशीव होतं. एक तर प्रेक्षकांशी एक वेगळय़ाच प्रकारची जवळीक असते. प्रत्येक प्रयोग हा तुम्हाला नवीन सादर करायचा असतो. त्यातून आपली कला अधिक बरी करायची असते.

नाटक हा पाया असतो. अभिनय कौशल्याची हल्लीच्या एम.बी.ए.वाल्या दुनियेच्या भाषेतली रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेन्टची कार्यशाळा. या कार्यशाळेत प्रत्येक प्रयोगागणिक तुम्ही रंगकर्मी म्हणून समृद्ध होत जाता. पूर्वी नटाचं नाव पाहून प्रेक्षक नाटकाला यायचे. आज परिस्थिती बदलली आहे. आज नाटकं नाटकाच्या नशिबावर चालतात. पूर्वी आडवारी दुपार, संध्याकाळचे प्रयोग व्हायचे. आज फक्त शनिवार रविवार खेळ होतात.

नाटकाव्यतिरिक्त टीव्ही आणि सिनेमातही तू आहेस की…

आहे…पण रमलो नाही. आयुष्याचं अर्थकारण हे एक सत्य आहे. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. हे प्रत्येक क्षेत्रात असतं. पण आपण आपल्या आवडीच्या ठिकाणीच रमतो.

मग तुझ्या मते तुझी बेस्ट नाटकं कोणती?

मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, अशी बायको हवी, बायको असून शेजारी आणि दिली सुपारी बायकोची…. ही सगळी नाटकं छान चालली. कलाकाराला अत्यंत आनंद देणारी जी गोष्ट असते– जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं…  ती गोष्ट या नाटकांनी मला दिली. शिकवलंही खूप.

‘चल काहीतरीच काय’ हे नाटक प्रकाश बुद्धिसागर, प्रशांत दामले आणि मी असं तिघांना वाचून दाखवलं तेव्हा त्यात फार काही मजा नाही असं वाटलं होतं. बुद्धिसागरांनी ते बसवताना मग काय काय घडू शकतं हे शिकवलं. माझे गुरू सतीष पुळेकरही असेच. शेवटी योग असावे लागतात हे खरं.

‘मोरूची मावशी’ करता दिलीप कोल्हटकरांनी चक्क ऑडिशन्स घेतल्या आणि मला व प्रशांतला सुयोगच्या पहिल्या नाटकात कास्ट केलं. सुधीरने ‘मोरूची मावशी’चे १६५ प्रयोग तोटय़ात हॅमर केले. नंतर एके दिवशी दूरदर्शनच्या ‘गजरा’मध्ये विजय चव्हाणांनी ‘टांग टिंग टिंगा’ सादर केलं आणि जे ते नाटक उचललं गेलं ते थेट २००० प्रयोग हाऊसफुल्ल होतं. योग असावे लागतात.

मराठीत फार्सकरिता जोडय़ा यशस्वी होण्याची प्रथा आहे. मग टुरटुर, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय सारखी सुपरहिट नाटकं करूनही तुझी आणि प्रशांत दामलेची जोडी पुढे का झाली नाही ?

 प्रशांत दामलेबद्दल एक गोष्ट खूप चांगली आहे. तो अत्यंत फोकस्ड आहे. त्याने त्याचं कार्यक्षेत्र ही रंगभूमी आहे हे खूप पूर्वी ओळखलं, निवडलं आणि राबवलं. हॅटस् ऑफ त्याला त्याच्या या हुषारी करता! तो फारसा टेलिव्हिजन किंवा सिनेमात घुसला नाही. त्याने सातत्याने नाटकं आणि चांगली चांगली नाटकं दिली आणि मग तो पुढे जात गेला.

मराठी कलाक्षेत्र अत्यंत बेभरवश्याचं आहे म्हणतात. तुझा काय अनुभव?

 आता बरंच बरं आहे. माध्यमं जास्त आहेत त्यामुळे संधी जास्त उपलब्ध होते. आमच्या वेळी परिस्थिती खूप वेगळी होती. मला घरातून एकदा सांगितलं गेलं की आता नाटक सोडा आणि पोटापाण्याचं काय ते बघा. आणि मग मला बँक ऑफ इंडियामध्ये कलाकार कोटय़ात नोकरी लागली. तेव्हा मला आईने सांगितलं की आता नाटक नाही सोडायचं अणि नोकरीही. मी आजपर्यंत आईचं ते सांगणं पाळत आलो. २८ फेब्रुवारी २०१८ ला मी बँक ऑफ इंडियामधून निवृत्त झालो. माझ्या बँकांनी आणि बँकातल्या लोकांनी मला सर्वपरीने सांभाळून घेतलं, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. या सगळ्यांचे खरंच उपकार आहेत. आता उर्वरित आयुष्य नीट जावं एवढीच इच्छा आहे.