हाफकीनमधील टाटाच्या रेडिओ थेरपी सेंटरसाठी विशेष अधिकारी- महसूलमंत्री

सामना प्रतिनिधी । मुंबई

परळ येथील हाफकीन संस्थेची जागा टाटा मेमोरियल सेंटरच्या बाल व महिला कॅन्सर रुग्णालय आणि रेडिओ थेरपी सेंटरसाठी देण्यात आली आहे. हा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प उभारणीसाठीची कामे तातडीने सुरू व्हावीत यासाठी विशेष अधिकारी नेमणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

प्रश्नोत्तरांच्या तासांत दत्तात्रय भरणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने ही जागा टाटा सेंटरला दिली असून लवकरच हे सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

पर्यायी इमारतीसाठी टाटाचे पाच कोटी
टाटा मेमोरियल सेंटरला देण्यासाठी प्रस्तावित केलेल्या हाफकीन संस्थेच्या जागेमध्ये संस्थेतील अधिकाऱ्यांची निवासस्थाने, विद्यार्थ्यांच्या खोल्या, अतिथीगृहे व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने येत असल्याने पर्यायी इमारती बांधण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर पाच कोटी रुपये देणार असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.