बुरी नजरवाले तेरा मुँह काला, मोदींना नजर लागू नये म्हणून कालभैरव मंदिरात पूजा


सामना ऑनलाईन। वाराणसी

आपल्या देशात लहान मुलांना, सुंदर जोडप्याला, सुंदर स्त्रीला ते अगदी नवीन गाडीपासून घराच्या प्रगतीला वाईट नजर लागू नये म्हणून मीठ मोहरी आणि मिरच्यांनी दृष्ट काढण्याची पद्धत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशभरात बहुमत मिळवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही प्रगतीला विरोधकांची नजर लागू नये , त्यांच्या मागची इडा पिडा टळावी म्हणून मोदी सर्मथकांनी वाराणसीतील कालभैरवाच्या मंदिरात मोदींच्या कटआऊटची विशेष पूजा करत दृष्ट काढली.

लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. सगळीकडे मोदी यांचे जंगी स्वागत होत आहे. त्यांना मिळालेल्या देदिप्यमान यशाचे अनेक ठिकाणी गोडवे गायले जात आहेत. पण यामुळे मोदी समर्थकांची मात्र झोप उडाली आहे. मोदींच्या प्रगतीला नजर लागेल अशी चिंता त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. यावर तोडगा म्हणून त्यांनी काशीचे कोतवाल म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबा कालभैरवाच्या मंदिरात रविवारी पुजाऱ्यांनी मंत्रघोषात मोदींच्या कटआऊटची दृष्ट काढली.

एवढेच नाही तर कालभैरवचे रक्षा कवच म्हणून मोदींच्या कटआऊटला गंडाही बांधला. यावेळी पुजाऱ्यांनी बटुक भैरव स्तोत्र, कालभैरव अष्टक स्तोत्र आणि नवग्रह शांती पूजन केलें. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात मोदींचे कटआऊट नेण्यात आले. तिथे त्याच्यावर मोहरीचे तेल, मद्य, आणि मिठाई या सगळ्यांनी मोदींची दृष्ट काढण्यात आली. जेणेकरून बाबा कालभैरवाचा आशीर्वाद नेहमी मोदींसोबत असेल. त्यानंतर मंदिराबाहेर असलेल्या कुत्र्यांना ही मिठाई खाण्यास दिली.