‘बेस्ट’साठी स्वतंत्र मार्गिका; वाहतूक पोलिसांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करणार

8

सामना ऑनलाईन । मुंबई

आधीच तोट्यात असलेल्या आणि वर वाहतूक कोंडीमुळे 10 टक्के ‘लॉसऑफ किलोमीटर’चे नुकसान सहन करणाऱ्या बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी मुंबईत पुन्हा एकदा रस्त्यांवर बेस्ट वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचा प्रयोग होणार आहे. बेस्टच्या स्वतंत्र मार्गिकेचा प्रयोग यशस्वी झाला तर बेस्टसह प्रवाशांचीही वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदतीने हा बेस्टसाठीच्या स्वतंत्र मार्गिकेचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.

मुंबई शहरात जागोजागी सुरू असलेली मेट्रोची कामे, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे सतत ट्रफिक जाममध्ये अडकलेल्या बेस्ट बसेसच्या आर्थिक गणितावर याचा परिणाम होत आहे. त्यातच जुन्या उड्डाण पुलांवर अवजड वाहनांच्या वेगावर घातलेली बंदी यामुळे मोठय़ा आकाराच्या बेस्ट गर्दीत तासन्तास अडकून पडत आहेत. त्यामुळे आपल्या मुक्कामी पोहचण्यासाठी गर्दीतून मार्ग काढणाऱ्या ओला, उबर, टॅक्सीसारख्या वाहनांना प्रवाशी प्राधान्य देत असल्याने बेस्टच्या तोट्यात भरच पडत आहे. काही वर्षांपूर्वी बीकेसीच्या रस्त्यावर एमएमआरडीएने बेस्टकरिता स्वंतत्र मार्गिका आखली होती. एप्रिल 2016मध्ये वांद्रे-कुर्ला संकुलात बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका सुरूही झाली. साडेतीन किलोमीटरचा मार्ग गर्दीच्या वेळेस पार करण्यासाठी लागणारा 45 मिनिटांचा वेळ पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत आला. तसेच वेळेची बचत होण्यासह त्या मार्गावर तुलनेने अधिक बस गाड्या चालवणे शक्य असल्याचे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले होते.

सहा ते सात लाखांचे आर्थिक नुकसान

जुहू एसएनडीटी येथील पूल, घाटकोपर लक्ष्मी बाग तसेच अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यात बेस्टही येते. या पुलांवरून धावणाऱ्या बस गाडय़ांना अन्य मार्गावरून वळवण्यात आल्याने बेस्टचे दिवसाला किमान सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचे सुनील गणाचार्य यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील काही मार्गांवर बेस्टच्या बसेसकरिता डेडिकेटेड कॉरिडॉर का नसावा, असा प्रश्न बेस्ट कमिटीच्या मंगळवारच्या बैठकीत चर्चेला आला. भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे हा प्रश्न उपस्थित करीत मेट्रोची कामे, रस्ते खोदकाम तसेच पुलबंदीमुळे बेस्टचे अनेक मार्ग वळवण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे इंधनाचा खर्च वाढण्यासह प्रवाशीही घटल्याचे ते म्हणाले. तर शिवसेनेचे सदस्य अनिल कोकीळ यांनी बेस्टच्या फेरींचे होणारे नुकसान मेट्रो, पालिका व राज्य सरकारकडून वसूल करावे, अशी मागणी केली. सदस्यांच्या या मागणीवर बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी बेस्टचा प्रवास वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी स्वतंत्र मार्गिकेची आखणी केली जाईल, असे सांगितले. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने अभ्यास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या