मसालेदार…चविष्ट भुरका

मीना आंबेरकर

उन्हाळ्यात जेवणाच्या पानात सारभात आणि चटकदार तोंडी लावणे असले की अजून वेगळे काही सांगत नाही.

आतापर्यंत आपण झणझणीत मसाले पाहिले, परंतु मसाले जसे पदार्थ झणझणीत, खमंग मसालेदार बनवतात तसेच काही मसाले सौम्य असतात. त्यामुळे पदार्थ मसालेदार न बनता सौम्य, परंतु चवदार बनतो. उन्हाळय़ाच्या दिवसांत आपल्याला मसालेदार जेवण नकोसे वाटते. साधा हलका, परंतु चविष्ट आहार घ्यावासा वाटतो. रोजची मसालेदार डाळ, भाजी यांच्या जागी काही हलके, परंतु जिभेला सुखावणारे खावेसे वाटते. आपल्या आहारात ‘सार’ या पदार्थाला स्थान मिळते. मग आपण भुरके मारत सार-भाताचा आस्वाद घेतो. आजारपणातही पथ्य सांभाळून जिभेला रुची देण्यासाठी साराचा उपयोग होतो. साराचा एक सर्वसाधारण मसाला आहे. अर्थात वेगवेगळय़ा प्रकारच्या पदार्थांच्या साराप्रमाणे या मसाल्यात थोडाफार बदलही असतो.

आपण एक सर्वसाधारण साराचा मसाला बघूया.

साहित्य..३ चमचे मोहरी, ३ चमचे जिरे, ३ चमचे मिरी.

वरील साहित्याची बारीक पूड करून बाटलीत करून ठेवावी. ताक, कढण, सूप यामध्ये हा मसाला वापरता येतो. आता आपण वेगवेगळय़ा पदार्थांपासून बनलेल्या सारांच्या खाद्यकृती पाहूया.

kokam-ras

आमसुलांचे सार

साहित्य…१० दळदार आमसुले, १ नारळ, दीड वाटी चिरलेला गूळ, ८ वाटय़ा पाणी,१ टे. स्पून मीठ, २ मिरच्या,2 टे. स्पून तांदळाची पिठी, २ चमचे साराचा मसाला.

कृती…८ वाटय़ा पाण्यात आमसुले स्वच्छ धुऊन उकळावे व उकळी आली की आमसुले काढून टाकावी. त्यात मीठ, मिरची, नारळ वाटून घालावे, गूळ घालावा, साराचा मसाला घालावा, तांदळाची पिठी लावावी व सार परत उकळावे.

थंडीत किंवा पावसाळय़ात ७-८ लसूण पाकळय़ा तुपात तळून वरून फोडणी दिल्यास अधिक रुचकर लागते.

kokam-sar

 कैरीचे सार भजी घालून

साहित्य…१ वाटी उकडलेल्या कैरीचा गर,२ वाटय़ा डाळीचे पीठ, २ वाटय़ा चिरलेला गूळ, मीठ चवीनुसार, ८-१0 लाल सुक्या मिरच्या, फोडणीसाठी पाव चमचा जिरे व १ टे. स्पून कढीपत्ता, पाव टी. स्पून हिंग, अर्धी वाटी ओला नारळ वाटून, साराचा मसाला २ चमचे.

भजी  २ टे. स्पून कैरीचा गर, २ वाटय़ा डाळीचे पीठ, १ टी स्पून लाल तिखट,१ टे. स्पून मीठ, पाव टी स्पून हळद, ३ टी स्पून कडकडीत तेलाचा मोहन हे सर्व भज्यांच्या पिठाप्रमाणे भिजवा. १ वाटी तेलात त्याची लहान लहान भजी तळून काढा.

साराची कृती…कैरीच्या गरात ८-१० वाटय़ा पाणी घालून त्यात २ चमचे डाळीचे पीठ कालवून त्यात वाटलेला नारळ घाला. साराचा मसाला घाला. जिऱयाच्या फोडणीत कढीपत्ता घालून त्यात ? तुकडे घाला व ती फोडणी सारात घाला. तळलेली भजी त्यात सोडून २ उकळय़ा काढा. गरम गरम सर्व्ह करा.

tomato-saar

 टोमॅटोचे सार

साहित्य…पिकलेले टोमॅटो १ किलो, १ नारळ, २ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी साखर,१ टे. स्पून मीठ, १0 वाटय़ा पाणी, १ इंच आल्याचा तुकडा, २ टे. स्पून तांदळाची पिठी, फोडणीसाठी १ टे. स्पून साजूर तूप,२ टी स्पून उडदाची डाळ, १ टी स्पून जिरे, ५-६ कढीपत्त्याची पाने, 2 चमचे साराचा मसाला.

कृती…प्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन उकडा. गार झाले की ते मिक्सरवरून काढा. नारळ, मिरची, आले, मीठ हे सर्व बारीक वाटा. हे सर्व एकत्र व त्यात पाणी घालून हे मिश्रण गाळून घ्या. त्याला तांदूळ पिठी लावा. साखर खाला व उकळायला ठेवा. तूप गरम करा. प्रथम उडदाची डाळ घाला, डाळ गुलाबी रंगावर आली की कढीपत्ता घाला. नंतर जिरे घाला, फोडणी द्या. साराचा मसाला घालून सार गरम करा.