‘तेसला’च्या राशीत कडक मंगळ, स्पोर्टस् कार अंतराळात भरकटली

सामना ऑनलाईन । फ्लोरिडा

मंगळ ग्रहावर माणूस पोहोचेल तेव्हा पोहोचेल पण एक स्पोर्टस् कार मात्र त्या प्रयत्नामध्ये अंतराळात भरकटली. एका खासगी कंपनीने कोणत्याही सरकारी मदतीशिवाय रॉकेटद्वारे ‘तेसला रोडस्टर’ ही महागडी स्पोर्टस् कार मंगळाच्या कक्षेत पाठवली होती, पण रॉकेटमधून बाहेर पडताच तिने दुसरीकडेच वळण घेतले. आता ‘हा माझा मार्ग एकला’प्रमाणे ती मंगळाऐवजी दुसऱ्याच छोटय़ा ग्रहांच्या कक्षेत फिरत आहे.

‘स्पेसएक्स’ या कंपनीने ६३.८ टनांच्या फाल्कन हेवी रॉकेटद्वारे ‘तेसला’ कार अंतराळात पाठवली होती. पृथ्वी आणि मंगळादरम्यानच्या अंतराळ कक्षेत तिला स्थिरावले जाणार होते. २७ मर्लिन इंजिन लावलेल्या २३० फुटी रॉकेटमधून या कारला अंतराळात नेण्यात आले. मंगळाच्या कक्षेजवळ हे रॉकेट पोहोचलेही. त्यानंतर या कारला पुश करून बाहेरच्या कक्षेत सोडण्यासाठी मोठा स्फोट केला गेला. तो स्फोट इतका मोठा होता की कार बाहेर पडताच ठरलेल्या दिशेऐवजी दुसरीकडेच भरकटली.

जगात पहिल्यांदाच असा प्रयोग झाला. ‘स्पेसएक्स’ कंपनीचे मालन एलन मस्क यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवरून ही माहिती जगाला दिली. तेसला भरकटली तरी स्पेसएक्सचे फाल्कन हेवी रॉकेट किती शक्तिशाली आणि भविष्यातील मोहिमांसाठी उपयोगी आहे हे जगाला कळले असे मस्क यांनी म्हटले आहे. मंगळाजवळील सेरेस या ग्रहाच्या कक्षेत ही कार फिरत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अंतराळात भरकटलेल्या तेलसा कारचे पुढे काय होणार कुणीच सांगू शकत नाही. अंतराळात अब्जावधी वर्षांपासून अनेक ग्रह, उपग्रह फिरत आहेत. अंतराळातील वातावरणात ते टिकून आहेत. मानवाने बनवलेली कार त्या वातावरणात किती काळ टिकू शकेल हे सांगणे कठीणच असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांनी फाल्कन रॉकेटच्या प्रवासाची छायाचित्रे आणि व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केले आहेत.