प्रशासकाची मानसिकता सोडा, खेळाडूंशी सौजन्याने वागा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपण खेळाडूंच्या व क्रीडा क्षेत्राच्या भल्यासाठी बसलोय याची जाण ठेवा आणि कठोर प्रशासकाची मानसिकता सोडून क्रीडापटूंशी सौजन्याने वागा अशा ‘कानपिचक्या’ नवे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोर यांनी मंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यावर जवाहरलाल नेहरू स्टेडियमला दिलेल्या भेटीत हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) अधिकाऱयांना दिल्या. येत्या फिफा अंडर १७ विश्वचषक फुटबॉल लढतींच्या पूर्वतयारीची पाहणी क्रीडा मंत्र्यांनी यावेळी केली.

४७ वर्षीय राज्यवर्धन राठोर हे माजी ऑलिम्पियन नेमबाज असून केंद्रीय क्रीडा खात्याची धुरा सांभाळणारे देशातील ते पहिले क्रीडापटू आहेत. त्यांनी मावळते क्रीडामंत्री विजय गोयल यांच्याकडून क्रीडा खात्याचा पदभार स्वीकारला आणि आज सकाळी ९.१५ वाजता थेट जवाहरलाल नेहरू स्टेडियमला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

क्रीडापटूंच्या गरजांना प्राधान्य द्या!

देशातील क्रीडापटू किती कष्टाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशासाठी पदक मिळवतात याचा अनुभव मी स्वतः २००४च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये घेतलाय असे सांगून राठोर म्हणाले, क्रीडापटूंच्या गरजांना प्राधान्य द्या, त्यांची काळजी घेण्यासाठी तुमची नियुक्ती सरकारने केलीय याचे भान ठेवून वागा, असाही सल्ला क्रीडा मंत्र्यांनी ‘साई’चे अधिकारी व देशभरातील स्टेडियम्सच्या प्रशासकांना दिला.