महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा गणवेश

सामना ऑनलाईन, मुंबई

इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांतील मुलांप्रमाणेच पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही या वर्षीपासून क्रीडा गणवेश मिळणार आहे. टी शर्ट, ट्रक पॅण्टसह कापडी बूट घातल्यावर खेळाडू असल्याचा अनुभव या गरीब घरातील मुलांनाही घेता येणार आहे.

महापालिकेच्या 1100 पेक्षा अधिक शाळांमधून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना या वर्षीपासून 27 शैक्षणिक वस्तूंबरोबरच आता क्रीडा गणवेशही दिला जाणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण दिले जाते. शाळेतील विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांमध्ये शालेयस्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरदेखील भाग घेत असतात. अशा विद्यार्थ्यांना त्या त्या क्रीडा प्रकारास आवश्यक असणारा ‘क्रीडावेश’ व ‘क्रीडा-साहित्य’ सन 1991 पासून दिले जाते. मात्र या वर्षीपासून सर्वच विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश दिला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱहाड यांनी दिली.

मनपा शाळांमध्ये विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार यादरम्यान आवश्यकतेनुसार व विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार एक किंवा अधिक तासिका राखून ठेवण्यात येतात. याव्यतिरिक्त दर शनिवारी विविध क्रीडा प्रकाराचा विशेष सरावदेखील घेतला जातो. क्रीडा प्रकारांचा ‘नियमित सराव’ आणि आठवडय़ातून एक दिवस घेतला जाणारा ‘विशेष सराव’ यादरम्यान मनपा शाळांमधील क्रीडा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारांच्या वैशिष्टय़ांची प्रात्यक्षिकांसह माहिती देऊन त्यांच्याकडून खेळांचा सराव करवून घेतात. यापैकी दर शनिवारी घेतल्या जाणाऱया विशेष सरावादरम्यान या वर्षापासून देण्यात आलेला क्रीडा गणवेश असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

चार रंगांचे चार हाऊस

इंग्रजी शाळांप्रमाणेच पालिकेच्या शाळांतही लाल, निळा, हिरवा किंवा पिवळा अशा चार रंगांचे गणवेश दिले जाणार आहे. चार रंगाचे चार हाऊस तयार करण्याची पद्धतही त्यामुळे येणार आहे. या रंगआधारित ‘हाऊस’ पद्धतीमुळे विविध खेळ खेळताना संघभावना तयार होण्यास मदत होते.