इंग्लंडसाठी रशियामध्ये हेरगिरी करणाऱ्यावर विषप्रयोग

सामना ऑनलाईन, लंडन

हेरगिरीवर आधारीत हॉलीवूडपटांमध्ये शोभेल अशी एक घटना इंग्लंडच्या सोल्सब्री भागात घडली आहे. इथे ६५ वर्षांची वृद्ध व्यक्ती आणि ३५ वर्षांची महिला बेशुद्धावस्थेत आढळले होते. बेशुद्ध होण्यापूर्वी हे दोघेजण आकाशाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करत होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. यातील वृद्ध व्यक्ती ही रशियासाठी अत्यंत खतरनाक व्यक्तींमधील एक आहे, जिचं नाव सर्गेइ स्क्रीपल असं आहे. इंग्लंडसाठी रशियाच्या सैन्यदलात वरिष्ठ पदावर काम करत असताना अतिसंवेदनशील माहिती इग्लंडची गुप्तचर यंत्रणा एम.आय.६ ला पुरवण्याचं काम या व्यक्तीने अत्यंत सफाईदारपणे केलं होतं.

सर्गेई आणि त्याच्यासोबतची महिला या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अज्ञात वस्तूच्या संपर्कात आल्यानं या दोघांची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याचं क्रेग होल्डन नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या दोघांची ही अवस्था नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे झाली याचा शोध सध्या सुरू आहे,खबरदारीचा उपाय म्हणून ज्या भागात स्क्रीपल आणि महिला बसले होते तिथली सगळी दुकाने बंद करण्यात आली आहे.

स्क्रीपल हा १९९९ पर्यंत रशियाच्या सैन्य दलातील गुप्तचर विभागात कर्नल पदावर काम करत होता. २००४ साली त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर त्याने कबूल केलं होतं की पैशांच्या मोहापायी त्याने इंग्लंडसाठी हेरगिरी केली होती. २००६ साली त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं, इंग्लंडने त्याला आसरा दिल्याने तो रशियातून पळून सोल्सब्री भागात स्थायिक झाला होता.