फेसबुकची हेरगिरी

‘स्पायडर’मॅन

केंब्रिज एनालिटीकाच्या डाटा चोरीच्या प्रकरणापासून फेसबुकच्या अनेक गुह्यांना एका मागे एक वाचा फुटते आहे. यूजर्सचा विविधांगी डाटा मिळवण्यासाठी फेसबुकने काय काय युक्त्या लढवल्या होत्या किंवा काय काय युक्त्या लढवल्या जात आहेत, हे पाहून थक्क व्हायला होते.

अमेरिकेच्या सिनेटने मार्क झुकरबर्गला प्रत्यक्ष समोर बोलावून अनेक शंकांचा खुलासा करून घेतला होता. उरलेले तब्बल दोन हजार प्रश्न लिखित स्वरूपात मार्कला देऊन त्यावर खुलासा करण्यासाठी काही वेळ देण्यात आला होता. आता या प्रश्नांच्या उत्तराचे २२५ पानी बाड फेसबुककडून सादर करण्यात आले आहे. यामध्ये फेसबुकचे एक एक कारनामे उघड झाले आहेत.

यूजरने फेसबुकवरती लॉग इन असताना साधा माऊस हलवला अथवा एखादी कीबोर्डवरची की जरी दाबली, तरी देखील त्याची नोंद फेसबुकतर्फे घेतली जाते. यूजरचा माऊस कुठल्या कंटेंटवरती जास्ती काळ रेंगाळला, कुठला कीवर्ड जास्ती वापरला गेला याची नोंद घेऊन त्या त्या माहिती प्रमाणे यूजर्सला जाहिराती दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे सर्व कमी की काय, म्हणून यूजर ज्या संगणक अथवा मोबाइलचा वापर फेसबुक वापरण्यासाठी करतो, त्याची पूर्ण माहिती फेसबुकमध्ये नोंदवली जाते. त्या डिव्हाईसमध्ये किती जागा शिल्लक आहे, बॅटरी किती शिल्लक आहे, फेसबुकचे ऍप किती बॅटरी वापरते आहे, फोटो कोणकोणते आहेत, कोणते नंबर आणि कॉन्टॅक्ट सेव्ह आहेत अशी इत्थंभूत माहिती गोळा केली जाते. सदर डिव्हाईसमध्ये कोणकोणते आणि किती ऍप्स आहेत, कोणते ऍप कितीवेळा आणि किती वेळेसाठी वापरले जातात, यूजर सगळ्यात जास्ती वेळासाठी कोणते ऍप वापरतो याची देखील नोंद होते. जोडीलाच मोबाइल किंवा संगणक कोणत्या नेटवर्कने जोडलेला आहे, त्याचा नेटवर्क पुरवठादार कोण आहे, वाय-फाय वापरले जात आहे की राऊटर ही सर्व माहिती फेसबुककडून संकलित केली जाते. अगदी डिव्हाईसच्या जीपीएसवरती देखील फेसबुक लक्ष ठेवून असते.