आत्मा म्हणजेच परमेश्वर

ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडितांना देवाची अनुभूती सर्व चराचरात होते. जे आहे ते जन्मजात देहातच भरून ठेवलंय. आत्मग्रंथाचं वाचन केलं तर धर्मग्रंथापलीकडचं बोलू शकू, असं त्यांचं मत.

देव म्हणजे?
देव म्हणजे आपण स्वतः. कारण आपल्यामध्येच देव नांदतो. आपल्या अवतीभोवतीचा निसर्ग हाच देव आहे आणि तोच सर्वत्र भरून राहिला आहे.

धार्मिक स्थळ?
कर्नाटकात शिवराय क्षेत्र

आवडती प्रार्थना
आत्मसुखासाठी घ्यावे नित्य नाम.. मुखाने म्हणावे शिव राम राम, राम नसे हा आकारातील शिव सत्त्व ते निराकारची, अजपाजप हे जपावे नित्य जेणे दिसेल तुम्हा अंतरीचे सत्य.

आवडते देवाचं गाणं?
ग. दि. माडगुळकरांचं ‘देव देव्हाऱ्यात नाही’.

वाचलेलं धार्मिक पुस्तक?
आत्मग्रंथ वाचलाय. तो जन्मासोबत तुमच्या देहात असतो. फक्त तो वाचता यायला हवा. श्वास घ्यायला कोणीही शिकवलेलं नाही. श्वासाची संजीवनी आपल्याला जन्मजात मिळाली आहे. हेच संजीवनी नाम म्हणजेच सोहंम् श्वास.

चमत्कारांवर विश्वास आहे?
माझ्या आयुष्यात अनेक दैवी चमत्कार झाले आहेत आणि त्यावर माझा प्रचंड विश्वास आहे.

समाधान मिळणारी गोष्ट?
सोहम् श्वासाद्वारे एकाग्र झाल्यावर आणि इतरांच्या उपयोगी पडल्यावर समाधान मिळतं. मला स्वतःचा देह इतरांच्या उपयोगी पाडायला खूप आवडतं.

देवावर किती विश्वास आहे? १०० टक्के विश्वास आहे. माझं जे काही सुरू आहे हे त्या देवामुळेच…

दुःखी असता तेव्हा?
निराश असतो तेव्हा माझ्या भाग्यात हे घडणारच होतं, असं मी स्वतःला पढवतो आणि दुसऱ्या क्षणी सकारात्मकतेने उभा राहतो.

नास्तिक लोकांबद्दल?
नास्तिक माणसं खूप छान आहेत, असं माझं म्हणणं भाग्यात हे घडणारंच होतं, असं मी स्वतःला पढवतो आणि दुसऱ्या क्षणी सकारात्मकतेने उभा राहतो. वारूळ लाथेने पाडलं की, ते दुसऱ्या दिवशी उभं राहतं. मुंग्या निराश होत नाहीत. कोळ्याचं जाळं कितीही वेळा तोडलं तरी ते बांधून तयार असतं. या बारीक सारीक किटकांना निराश व्हायचं नाही हे ज्ञान देवानं दिलं. तर आम्ही माणसं का निराश होतो. त्यामुळे मी कधीही निराश होत नाही.

देवभक्त असावं पण देवभोळं नसावं…तुमचं मत काय?
बरोबर आहे. याचं उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर माऊली. त्यांनी मुक्ताईला भूक लागली तेव्हा देवाकडे प्रार्थना केली नाही. त्यांचा विश्वास होता देव काहीतरी करणार, पण स्वतःही प्रयत्न करेल आणि त्यांच्या पाठीवर मांडे भाजले गेले. बारीकसारीक गोष्टींसाठी देवाचा आधार घेऊ नये. देवाने आपल्याला सुंदर शरीर दिलंय.

इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करता का? अजिबात नाही.

ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास आहे?
विश्वास आहे, तो एक आधार आहे, पण ते सर्वस्व मानू नये. ज्योतिष म्हणजे ज्योत ईश. इश्वरेच्छेनेच आतमध्ये ज्योत आहे. ती देहाला प्रेरणा देते. देह पंचमहाभूतांनी घडलेला असल्यामुळे पंचमहाभूतांचा या देहावर परिणाम होत असतो.

उपवास करता का
लंघन करतो.

अभिनय-भक्तीची सांगड कशी घालता?
अभिनय आणि भक्तीची सांगड खूप सुंदर आहे. अभिनयात तुम्ही कट ऑफ होणं महत्त्वाचं. म्हणजे आता मी प्रसाद पंडित आहे, तर दुसऱ्या क्षणी मी एखाद्या व्यक्तिरेखेत शिरतो. कट ऑफ आणि समरस होणं हे अभिनयातून शिकलो तेच भक्तीत आहे. जसा एकरूप भक्तीत होतो तसेच अभिनयातही होतो. अभिनय-भक्तीची जुळवाजुळव करतो.

मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना?
दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे दोन्हीही महत्त्वाच्या आहेत. प्र अर्थ ना म्हणजे प्रत्येक प्रार्थनेत अर्थ दडलाय त्याची प्रत्यक्षात अनुभूती घेता यायला हवी. प्रार्थनेत मूर्ती दडलेली आहे.