मालवणीच्या न्यू महाकाली नगरचा पाणी प्रश्न सुटणार

सामना ऑनलाईन । मुंबई

मालाड-मालवणी येथील न्यू महाकाली नगरमधील रहिवाशांचा पाणीप्रश्न आता सुटणार आहे. ‘एसआरए’अंतर्गत येथे बांधण्यात आलेल्या पुनर्रचित इमारतींना तीन वर्षे होऊनही पाण्याचे कनेक्शन नव्हते. त्यामुळे 500 हून अधिक भाडेकरूंवर, रहिवाशांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली होती. येथील रहिवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात मुंबई उपनगर एसआरए महासंघाने एसआरएच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून त्यामुळे रहिवाशांचा पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगर एसआरए महासंघाची स्थापना केली आहे. या महासंघाने आजवर 300 सोसायट्यांना भेट देऊन त्यांच्या समस्यांचा आढावा घेतला आहे. मालाडच्या न्यू महाकाली नगर येथे एआरए प्रोजेक्ट राबवताना बिल्डरने रहिवाशांचे 12 कोटींचे भाडे थकवले आहे. तसेच 17 मजल्यांची परवानगी असतानाही बिल्डरने 22 मजली इमारत बांधली आहे. 13 कोटींचा ऍसेसमेंट रवी बिल्डरचे जयेश शहा यांनी थकवल्याने तीन वर्षे होऊनही या पुनर्रचित इमारतीला पाण्याचे कनेक्शन नाही. या रहिवाशांच्या विविध प्रश्नांसंदर्भात समितेचे विनोद घोसाळकर यांनी नुकतीच एसआरएचे मुख्य अधिकारी दीपक कपूर यांची भेट घेतली. पुनर्रचित इमारतीवर मालमत्ता थकबाकीचा बोजा लादू नये, येथील रहिवाशांचा पाणीप्रश्न सोडवावा आणि अनधिकृत मजल्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. या मागण्यांवर कपूर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच येथील पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन कपूर यांनी समितीला दिले.

एसआरएमध्ये एक खिडकी योजना राबवा!
‘एसआरए’ प्रकल्पाला गती मिळण्यासाठी एक खिडकी योजना राबवावी, रहिवाशांच्या पात्रतेसाठी लागणारा कालावधी निश्चित करावा, ‘एसआरए’अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारती निकृष्ट दर्जाच्या असतात त्यामुळे त्यांचे ऑडिट करण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी अशा मागण्याही यावेळी मुंबई उपनगर एसआरए महासंघाने केल्या आहेत.

बरेचसे बिल्डर इमारतीचे काम अर्धवट ठेवतात. त्यामुळे रहिवाशांवर वर्षानुवर्षे ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये राहण्याची वेळ येते. तर काही बिल्डर रहिवाशांचे भाडे थकवतात. अशा ‘एसआरए’संबंधित अनेक समस्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्याचे काम मुंबई उपनगर एसआरए महासंघ करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या