श्रीलंकेत आणीबाणी घोषित, हिंदुस्थानी संघ सुरक्षित

सामना ऑनलाईन । कोलंबो

बौद्ध आणि मुसलमान समाजात तणाव वाढल्याने श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. अर्थात या आणीबाणीचा राजधानी कोलंबोमध्ये कोणाताही परिणाम झालेला नाही. श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी क्रिकेट मालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. निधास चषक स्पर्धेतील सर्व कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार होणार  आहेत. बीसीसीआयने ही माहिती दिलीय.

श्रीलंकेतील कँडी जिल्ह्यामध्ये बौद्ध समाज आणि मुसलमान समाजामध्ये वाद झाला. मुसलमान समाजाकडून बौद्ध वास्तूंची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप बौद्ध समाजाने केला आहे. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. तसेच काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही समाजातील वाढता तणाव पाहता आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी प्रवक्ते दयाशिरी जयसेकरा यांनी दिली आहे.

रोहिंग्यांना विरोध
श्रीलंकेमध्ये गेल्या वर्षीपासूनच दोन समुदायांमध्ये सांप्रदायिक तणाव वाढल्याचे दिसून आले आहे. यामागे म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना शरण देण्याचा मुद्दा असल्याचे बोलले जात आहे. काही बौद्ध संघटनांकडून म्यानमारमधून येणाऱ्या रोहिंग्यांना श्रीलंकेमध्ये शरण देण्याला विरोध करण्यात आल्यानंतर हा तणाव निर्माण झाला.

सोशल मीडियावर बंधन
आणीबाणीच्या काळामध्ये सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट, फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून तणाव वाढवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले.

हिंदुस्थानी संघ श्रीलंकेत
यजमान श्रीलंका आणि बांग्लादेश संघासोबत तिरंगी टी-२० मालिका खेळण्यासाठी हिंदुस्थानचा क्रिक्रेट संघ श्रीलंकेमध्ये दाखल झालेला आहे. तिरंगी मालिकेतील पहिला टी-२० सामना आज सायंकाळी हिंदुस्थान आणि श्रीलंका संघामध्ये होणार आहे. मात्र आणीबाणी घोषित करण्यात आल्यामुळे तिरंगी मालिकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.