श्रीलंकेच्या संसदेत राडा! खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले

सामना ऑनलाईन, कोलंबो

श्रीलंकेत निर्माण झालेले राजकीय पेचप्रसंग काही सुटण्याची चिन्हे दिसत नाही. दिवसेंदिंस परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. श्रीलंकेच्या संसदेत गुरुवारी खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे दुर्दैवी चित्र बघायला मिळाले. राजपक्षे समर्थक आणि विरोधक खासदार आपसातच भिडले. राजपक्षे सरकारविरोधात बुधवारी संसदेत अविश्कास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही हाणामारी झाली.

संसदेचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष कारु जयसूर्या यांनी देशामध्ये सरकार अस्तित्वात नाही. त्यामुळे कोणीही पंतप्रधान नाही असे जाहीर केले. त्यावरून गदारोळ सुरू झाला. कारु जयसूर्या युनायटेड नॅशनल पार्टीशी संबंधित आहेत. याच पक्षाचे प्रमुख रानिल किक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदाकरून काढून टाकण्यात आले होते. महिंदा राजपक्षे यांनी संसद अध्यक्षांच्या या विधानावर आक्षेप घेतला. संसदेच्या अध्यक्षांना आवाजी मतदानाच्या बळावर आपल्याला पंतप्रधानपदावरून हटवण्याचा अधिकार नाही, असा दावा महिंदा राजपक्षे यांनी केला. संसद अध्यक्ष जयसूर्या यांना पंतप्रधान नियुक्त करण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार नाही, असेही राजपक्षे यांचे म्हणणे आहे.

सभागृहाचे कामकाज गुरुवारी सुरू होताच राजपक्षे यांचे समर्थक खासदार सभागृहाच्या मध्यभागी जमले. काही जण घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने धावले. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्या हाणल्या. काही खासदारांनी पाण्याच्या बाटल्या, पुस्तके अध्यक्षांच्या दिशेने फेकून मारली. राजपक्षे यांना विरोध करणारे खासदार जयसूर्या यांना संरक्षण देण्यासाठी त्यांच्याभोवती जमले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसल्यानंतर जयसूर्या यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.