साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू

1

सामना ऑनलाईन । कोलंबो

आठ साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सोमवारी रात्रीपासून देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी ही घोषणा केली. रविवारी सकाळी लागोपाठ झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 290 लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो लोक जखमी झाले. स्थानिक मुस्लिम संघटना ‘नॅशनल तौहीद जमात’ने हा हल्ला केल्याचे सरकारी प्रवक्ते राजीथा सेनारत्ने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

रविवारची सकाळ श्रीलंकेसह जगभरात दु:खाचा डोंगर घेऊन उगवली. श्रीलंकेमध्ये हॉटेल आणि चर्चमध्ये झालेल्या सलग आठ साखळी बॉम्बस्फोटात 290 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जगभरातील 35 देशातील नागरिकांचा समावेश आहे. यात जदयूच्या चार कार्यकर्त्यांसह एकूण सात हिंदुस्थानी लोकांचा समावेश आहे. तसेच जखमींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेत कोलंबो विमानतळावर अजून एक जिवंत बॉम्ब सापडला

दरम्यान, साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी आतापर्यंत 24 लोकांना अटक करण्यात आली आहे. ‘नॅशनल तौहीद जमात’ने हा हल्ला केल्याचे श्रीलंकन सरकारने घोषित केले आहे. तसेच या संघटनेला देशाबाहेरून मदत मिळाली असावी अशी शक्यता असल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचेही सरकारने सांगितले.