रवीशंकर यांच्या मदतीने राममंदिर मुद्दा बारगळवण्याचे भाजपाचे प्रयत्न-हिंदू महासभा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

राममंदिराचा प्रश्न सुटावा यासाठी आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी सगळ्या पक्षकारांशी संपर्क साधला आहे. मात्र याला हिंदू महासभेने आक्षेप घेतला आहे. रविशंकर यांना मध्यस्थता करण्याचा अधिकार नाही असं म्हणत हिंदू महासभेने रविशंकर यांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली आहे. रवीशंकर यांच्या पुढाकारामागे काहीतरी राजकारण असावं असा संशयही महासभेने व्यक्त केला आहे.

हिंदू महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस मुन्ना शर्मा यांनी एक पत्रक जारी केलंय, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मंदिर बनावं यासाठी रवीशंकर यांनी याआधी कधीही प्रयत्न केले नाहीत, मंदिरासाठी झालेल्या आंदोलनातही त्यांनी कधी भाग घेतला नाही,ते पक्षकारही नाहीत मग के मध्यस्थता कशी काय करु शकतात ? भगवान श्रीरामाचं कधी दर्शनही न घेतलेल्या रवीशंकर यांनी स्वत:ला मध्यस्थ घोषित करणं हे हास्यास्पद असल्याचंही शर्मांचं म्हणणं आहे. २०१९ ची निवडणूक भाजपाने जिंकावी यासाठी रवीशंकर यांना हा मुद्दा बासनात गुंडाळून ठेवायचा असल्याचा आरोपही हिंदू महासभेने केला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला असून सर्वोच्च न्यायालयातही मंदिराच्याच बाजूने निर्णय होईल असं हिंदू महासभेचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने संसदेत विशेष कायदा बनवून राम मंदिराचा मार्ग मोकळा करणं गरजेचं असल्याचंही महासभेने म्हटलं आहे. मंगळवारी रवीशंकर यांनी उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांची भेट घेतली होती. ज्या लोकांना देशामध्ये शांतता नकोय अशी लोकंच या भेटीचा विरोध करत असल्याचं म्हणत रिझवी यांनी हिंदू महासभेचं नाव न घेता टीका केली होती.