श्रीकार भारतचा शतकी धमाका

सामना ऑनलाईन, बंगळुरू

यष्टिरक्षक फलंदाज श्रीकार भारतने झळकावलेल्या 106 धावा… त्याला कुलदीप यादवने 52 धावा करीत दिलेली उत्तम साथ… तसेच शाहबाज नदीम व कृष्णप्पा गौतम यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थान ‘अ’ संघ येथे सुरू असलेल्या दुसऱया चार दिवसीय कसोटीच्या तिसऱया दिवसअखेरीस फ्रंटफूटवर उभा आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पहिला डाव 346 धावांमध्ये आटोपल्यानंतर हिंदुस्थान ‘अ’ संघाने पहिल्या डावात 505 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने 2 बाद 38 धावा केल्या असून आता त्यांचा संघ 121 धावांनी पिछाडीवर आहे.

हिंदुस्थान ‘अ’ संघाने तीन बाद 223 या धावसंख्येवरून सकाळच्या सत्रात खेळायला सुरुवात केली. कर्णधार श्रेयस अय्यर 42 धावांवर बाद झाला. तसेच शुबमन गिलने 50 धावांची खेळी साकारली, पण सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रीकार भारत याने 186 चेंडूंत एक षटकार व बारा चौकारांसह 106 धावा चोपून काढल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने पाच चौकारांसह 52 धावांची उपयुक्त खेळी साकारली. त्यामुळे हिंदुस्थान ‘अ’ संघाला 505 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाकडून ख्रिस ट्रेमेन व ऍश्टन ऍगर यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले.

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या दुसऱया डावाचीही सुरुवात निराशाजनक झाली. कर्टिस पॅटर्सन चार धावांवर आणि मॅट रेनशॉ 19 धावांवर बाद झाला. कृष्णाप्पा गौतम व शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उद्या लढतीचा शेवटचा दिवस असून या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने जिंकलाय.