पत्नी रागावली म्हणून एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

सामना ऑनलाईन । नागपूर

मित्रांसोबत रात्री दारू पिऊन सासूरवाडीला गेल्या कारणामुळे पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यातूनच एसआरपीएफ जवान असलेल्या पतीने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना हिंगणा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. विनोद घेवंडे (29) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून, विनोदच्या मागे त्याची एक अडीच वर्षाची मुलगी, पत्नी आणि आई वडील असे कुटुंब आहे.

मंगळवारी ड्युटीवरून सुटल्यानंतर विनोद मित्रांसोबत पार्टीत दारू प्यायला मात्र झींगलेल्या अवस्थेत घरी जाणे शक्य नसल्यामुळे त्याने सासूच्या घरी जाऊन रात्र काढली व बुधवारी सकाळी घरी परतला. विनोद घरी आल्यानंतर पत्नीला विनोद दारू प्यायल्याचा संशय आला. पत्नीने जाब विचारण्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या दरम्यान, विनोदचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी घरी आला असता त्याच्या समोरही पत्नीने विनोदचा पानउतारा केला, त्यामुळे त्याला प्रचंड राग आला होता, त्याने पत्नीला आपण तिच्या आईकडे एटीएम विसरलो आहे, ते घेऊन आणण्यासाठी घराबाहेर पाठविले. मित्र गेल्यावर आई आणि वडील घराच्या बैठकीत बसलेले होते. एकांत बघून विनोदने बेडरूमध्ये स्वत:ची सर्व्हिस रिव्हॉल्वर कानशिलाला लाऊन गोळी झाडून घेतली.

जोराचा आवाज झाला म्हणून विनोद यांचे आई, वडील काय झाले म्हणून पाहण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये गेले असता त्यांना मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी शेजाऱ्यांच्या  मदतीने विनोदला खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.