मुंबई गोवा महामार्गाच्या कामामुळे एसटी बस प्रवाशांना सोसावा लागतोय आर्थिक भुर्दंड

88
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । अलिबाग

मुंबई गोवा महामार्गाचे पळस्पे इंदापूर या पहिल्या टप्याचे काम सुरू आहे. अंतोरे फाटा ते पेण दरम्यान महामार्गाचे काम सुरू असल्याने एसटी बसचा मार्ग अंतोरे फाटामार्गे पेणकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळे एसटी बसचे किलोमीटर वाढत असल्याने वाढीव तिकीटदर प्रवाशांकडून वसूल करण्याच्या अजब सूचना आगार प्रमुखांनी वाहकांना दिल्या आहेत. त्यामुळे नॅशनल हायवेच्या कामाचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्याचे काम सहा ते सात वर्षांपासून सुरू आहे. या कामाला आता गती आली आहे. अंतोरे फाटा ते पेण दरम्यान काम जोराने सुरू आहे. त्यामुळे नॅशनल हायवेने पेण कडे येणारा एसटी बसचा पूर्वीचा रस्ता कामानिमित्त दोन दिवसापासून बंद केला आहे. त्यामुळे एसटी बसला अलिबाग, पनवेल मुंबई, ठाणे, पुणे, स्वारगेटकडे जाताना अंतोरे फाट्यावरून पेणकडे जावे लागते.

एसटी बसला आपला रस्ता बदलावा लागत असल्याने किलोमीटर वाढले जात आहेत. त्यामुळे एसटी बसला वाढलेल्या किलोमीटरचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे या वाढलेल्या अंतराचा तोटा हा प्रवाशांच्या खिशातून वसूल करण्याच्या अजब सूचना अलिबाग आगर प्रमुखांनी वाहकांना केली आहे. यामध्ये एक स्टेजचे तिकीट जादा पैसे घेऊन प्रवाशाना द्यायचे आहे. तर अलिबागकडे वडखळच्या पुढे येणाऱ्या प्रवाशांकडूनही तिकिटाचे जास्ती भाडे घेण्याच्या सूचना केल्या आहेत. नॅशनल हायवेच्या या कामामुळे प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने आम्ही जास्तीचे पैसे का द्यायचे असा प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे अंतोरे फाटा ते पेण दरम्यान काम सुरू आहे. मात्र हे काम सुरु असताना महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कोणतीही सूचना न देता पेणकडे येणारा एसटी बसचा पूर्वीचा मार्ग बंद केला. त्यामुळे आमच्या एसटी बस या अंतोरे फाट्यावरून पेण मध्ये येत असल्याने एसटी बसचे किलोमीटर वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना जास्तीचे तिकीट दर द्यावे लागत आहे. याबाबत आमची महामार्ग अधिकारी, पोलीस याची मिटिंग झाली असून ते रस्ता एसटी साठी करून देणार असे सांगितले आहे. तो जर रस्ता दिला तर प्रवाशांना जास्तीचा तिकीट दर द्यावा लागणार नाही अन्यथा जास्तीचा दर द्यावा लागणार आहे.
– अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रायगड

आपली प्रतिक्रिया द्या