दसऱ्याच्या मुहूर्तावर मुद्रांक शुक्ल कार्यालये सुरू रहाणार

सामना ऑनलाईन, पुणे

साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जमीन, फ्लॅटच खरेदीसाठी अनेकजण गर्दी करतात. अशा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड येथील काही दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारी (दि. ३०) सुरू राहातील, असा निर्णय राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे.

दसऱ्याला शासकीय सुट्टी असल्याने त्या दिवशी सर्व कार्यालये बंद असतात. त्याचा फटका खरेदीदारांना बसू शकतो. राज्यभरात ५०७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. गेल्यावर्षी यातील काही निवडक दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दसऱ्याच्या दिवशी सुरू ठेवली होती. त्यामुळे जमीन, सदनिका, घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नोंदणी करता आली. यंदाच्या वर्षीही दसऱ्याला सुट्टी रद्द करून दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पुण्यातील ३, नाशिकमधील ३, ठाणे शहरातील ३, ठाणे ग्रामीणमधील ४, पालघरमधील ५ आणि रायगड येथील २ ही निवडक दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारी (ता.३०) सुरू ठेवणचा निर्णय घेतला आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक चिंतामण भुरकुंडे यांनी ही माहिती दिली आहे.