स्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन

सामना ऑनलाईन । लॉस एंजल्स

‘स्पायडर मॅन’, ‘हल्क’, ‘आयर्न मॅन’ यांसारख्या अनेक सुपरहीरोंचे जनक, कॉमिक्स जगताचे महानायक स्टेन ली यांचे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. स्टेन ली यांच्यावर लॉस एंजल्समधील सीडस् मेडिकल सेंटर येथे उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. स्टेन ली यांचे जगभरात चाहते आहेत. लहान मुलांमध्ये त्यांनी निर्माण केलेले ‘सुपरहीरो’ खास लोकप्रिय आहेत. ली यांच्या निधनाने कॉमिक्स जगताचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कॉमिक्स लेखक, संपादक असलेले स्टेन ली हे निर्माते, अभिनेते आणि प्रकाशकही होते. ली संपादक असलेल्या ‘मार्वल कॉमिक्स’ने जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली. 1961 मध्ये ‘द फँटास्टिक फोर’ हे सुपरहीरो असलेले कुटुंब ली यांनी पहिल्यांदा निर्माण केले. त्यानंतर ली यांच्या लेखणीतून अनेक सुपरहीरोंना जन्म दिला. ‘स्पायडर मॅन’, ‘हल्क’, ‘एक्स मॅन’, ‘आयर्न मॅन’, ‘ब्लॅक पँथर’, ‘कॅप्टन अमेरिका’, ‘अँट मॅन’ या सुपरहीरोंनी अवघ्या जगाला भुरळ घातली.