नगरसेवकांच्या विकास निधीत 100 कोटींची वाढ

सामना ऑनलाईन, मुंबई

पालिकेच्या 30 हजार 692 कोटींच्या अर्थसंकल्पाला आज स्थायी समितीची मंजुरी मिळाली. यामध्ये नगरसेवकांच्या विकास निधीत 100 कोटींची वाढ झाली असून एकूण 450 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांना आपापल्या विभागात विकासकामे करण्यासाठी या वर्षी जादा निधी मिळणार आहे. गेल्या वर्षी नगरसेवकांसाठी 350 कोटींचा विकासनिधी मंजूर करण्यात आला होता.

पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी 30 हजार 692 कोटी रुपयांचा 2018-19चा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. अर्थसंकल्पात या वर्षीदेखील मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादण्यात आली नाही. 4 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आजपर्यंत स्थायी समितीच्या विशेष बैठकींमध्ये नगरसेवकांनी आपली मते मांडून मुंबईच्या विकासकामांबाबत चर्चा केली. यामध्ये अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा वापर होऊन विकासकामे वेगाने होण्यासाठी दर तीन महिन्यांनी अर्थसंकल्पाचा आढावा घ्यावा अशा सूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केल्या. दरम्यान, अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यामुळे आता महासभेची अंतिम मंजुरी दिली जाईल. लवकरच आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवडय़ातच महासभा अर्थसंकल्प मंजूर करेल असे बोलले जात आहे.

अशी होणार 450 कोटींची विभागणी

मुंबई महापालिकेत 227 नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये विकास निधी व 60 लाख रुपये नगरसेवक निधी मिळत असतो. यासाठी अर्थसंकल्पात 17 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच करण्यात आली आहे.

मात्र विकास निधीपोटी आयुक्तांनी केकळ 210 कोटी रुपये मंजूर केल्याने नगरसेवकांना प्रत्येकी केकळ एक कोटी रुपयेच मिळणार आहेत. तर महापौर निधी यावेळेस 50 कोटी रुपये असणार आहे. उर्वरित 190 कोटी रुपये विकास निधीचे सर्वपक्षीयांमध्ये संख्याबळानुसार वाटप होणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत नगरसेवकांना या वर्षी 100 कोटी वाढीव विकास निधी मिळाल्यामुळे आपापल्या विभागात जादा विकासकामे करता येतील.  सर्व पक्षांच्या संख्याबळानुसार या निधीची विभागणी होईल. लवकरच याबाबत निर्णय होईल- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती