शरद पवारांना धक्का; बारामतीचे पाणी माढ्याला वळवणार

6
sharad-pawar

सामना ऑनलाईन । बारामती

लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दणका दिला आहे. राज्य सरकारने निरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी माढ्याला वळवण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात निरा देवधर धरणाच्या पाण्याचा वाद पेटला होता. निरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी रोखण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी तातडीने बारामतीला जाणारे पाणी बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बुधवारी सरकारने अध्यादेश काढत बारामतीचे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे.

1954 च्या पाणीवाटप कायद्यानुसार वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57 टक्के तर डाव्या कालव्यातून 43 टक्के पाणीवाटपाचे धोरण होते. मात्र, शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये या करारात बदल केला. त्यात निरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून 60 टक्के पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला तर 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला होता. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंत करण्यात आला होता. मात्र, आजही याच करारानुसार बारामतीला पाणी दिले जात होते. त्यामुळे बारामतीला जाणाऱ्या नियमबाह्य पाण्याचा वाद पेटला होता. त्यावर सरकारने अध्यादेश काढून बारामतीचे पाणी वळवण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार यांना धक्का मानला जात आहे.