राज्यात एक लाख दहा हजार शौचालयांची गरज, स्वच्छतामंत्र्यांची कबुली

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील ३४ जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. ग्रामीण भागात ६० लाख शौचालये तर शहरी भागात आठ लाख शौचालये बांधली आहेत, पण अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. राज्यात अजून एक लाख १० हजार शौचालये बांधण्याचे काम शिल्लक असल्याची कबुली पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिली. मुंबईत रेल्वे रुळांवर शौचालयाला बसण्याचे प्रकार सुरूच आहेत अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

राज्य हागणदारीमुक्त करण्याचे काम पूर्ण झाले आहे. २०१२ मध्ये केंद्र व राज्य सरकारने सर्व्हे केला होता. त्यानुसार ६० लाख लोकांच्या घरात स्वच्छतागृह नसल्याचे आढळून आले होते. त्यानंतर राज्यात ५६ लाख वैयक्तिक व चार लाख वैयक्तिक शौचालये बांधली. अशाप्रकारे राज्यात ६० लाख शौचालये बांधण्यात आली. हागणदारीमुक्त गावांना संत गाडगेबाबा यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

३०० कीर्तनकारांमार्फत प्रबोधन
राज्य सरकारने शौचालये बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. आता त्याचा वापर करण्याची जबाबदारी राज्यातील जनतेची आहे. शौचालयांचा वापर करण्यासाठी गावागावात प्रबोधन सुरू आहे. त्यासाठी ३०० कीर्तनकारांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांनी जीवनशैली बदलण्याचे आवाहन केले जात आहे.

एक लाख शौचालयांची गरज
राज्य सरकारने २०१२ मध्ये केलेल्या बेसलाइन सर्व्हेनुसार राज्यात शौचालये बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे, पण बेसलाइन सर्व्हेमध्ये समावेश नसलेल्यांसाठी एक लाख १० हजार शौचालये बांधण्याचे काम शिल्लक आहे. बेसलाइन सर्व्हेनंतर काही कुटुंबे वाढली. काही कुटुंबे विभक्त झाली. वाढलेल्या कुटुंबांसाठी संडास बांधण्याची गरज आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेमार्फेत उर्वरित शौचालये बांधण्याचे काम सुरू आहे अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली.

रेल्वे रुळांवरील समस्या कायम
मुंबईत रेल्वे रुळांवर बसण्याचे प्रकार सुरूच आहेत अशी कबुली लोणीकर यांनी दिली. अनेक झोपडपट्टीधारकांच्या नावांवर घरे नसतात. त्यामुळे त्यांना संडास बांधून देण्यात अडचणी येतात, पण त्यांच्यासाठी फिरती शौचालये ठेवली आहेत. तीही कमी पडत असल्यास आमदार-खासदार फंडातून ते बांधण्यात येतील.