रजापूरचे शिक्षक संजय खाडे राज्य शिक्षक पुरस्काराचे मानकरी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रजापूर येथील पदवीधर प्राथमिक शिक्षक संजय खाडे यांना २०१७-२०१८ चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. सातत्याने नवनवीन आनंददायी उपक्रमांच्या माध्यमातून खाडे यांनी विद्यार्थ्यामध्ये गोडी निर्माण केली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातील एकमेव प्राथमिक शिक्षक म्हणून राज्य शासनाने संजय खाडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.

खाडे यांनी रजापूर शाळेतील विद्यार्थी, इतर इंग्रजी माध्यमाच्या, खासगी संस्थेच्या शाळेत प्रवेश घेण्यापासून थांबविले. रजापूर जिल्हा परिषद शाळा आयएसओ मानांकित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्याना अवांतर वाचनाची गोडी लावली. शाळेतील मुले स्वअभिव्यक्तीच्या आविष्कारातून स्वत:च्या कविता, कथा लिहू लागले. दरवर्षी विद्यार्थ्याचे साहित्य संमेलन भरविले जाते. यात विद्यार्थी आपल्या कथा व कविता सादर करतात. बालसृष्टी हे विद्यार्थ्याच्या कविता, कथा, चित्र, निबंध, विनोद, ललित, सामान्य ज्ञान आदी अभिव्यक्तीची भित्तिपत्रे शाळेत चालविली जातात. शाळेत जनाकीदेवी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून प्रोजेक्टर व ई-लर्निंंग सुविधा उपलब्ध केली आहे. ग्रामपंचायत रजापूरच्या निधीतून प्रत्येक वर्गात एलईडी टीव्ही, सीपीयू, वायरलेस की-बोर्ड व वायरलेस माऊस, चैतन्य सॉफ्टवेअरचा ई-लर्निंग डेटा उपलब्ध केला आहे. डिजिटल शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा गुणवत्ता विकास उंचावत नेण्यार्चेâ ते करीत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, वत्तृâत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, भाषिक खेळ, गट कार्य, ज्ञानरचनावादी वर्गाच्या माध्यमातून अध्ययन- अध्यापन, शालेय रोपवाटिका, सहली क्षेत्रभेटी, रीड रजापूर रीड आदी नावीन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवितात.

त्यांनी राबविलेल्या याच उपक्रमांमुळे रजापूर जिल्हा परिषद शाळेस अनेक शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती भेटी देतात. शालेय परिसरात वृक्षारोपण व संवर्धन केले आहे. शाळेत हॅण्डवॉश स्टेशन, वॉटर फिल्टर, मोटार पँप, कपाट, टेबल, अवांतर वाचनाची पुस्तके व इतर लोकसहभाग मिळविला आहे.

खाडे यांची १९९५ साली प्रथम नेमणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेहरबान नाईक तांडा येथे झाली होती. तेथे त्यांनी बंजारा भाषेत विद्यार्थ्यासाठी शब्दकोश तयार करून मराठी वाचनाची गोडी निर्माण केली. तिथे त्यांनी भाषिक खेळ घेतले. त्यानंतर केंद्र प्राथमिक शाळा, कडेठाण येथे क्रीडा स्पर्धा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तयारी, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, ‘अंकुर’ या भित्तिपत्रकाचे प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम, संगणक शिक्षण आदी उपक्रम राबवले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारुंडी येथे बदली झाल्यानंतर त्यांनी लोकसहभाग मिळवत शालेय परिसरात जेसीबीच्या माध्यमातून मैदान तयार केले. शालेय परिसराला तारेच्या कुंपणाने संरक्षित केले. विद्यार्थ्याना क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार केले. याठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय व शिष्यवृत्ती परीक्षेची विद्यार्थ्याची विशेष तयारी करून घेतली. त्यामुळे चार विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेशित झाले आहेत, तर २५ विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.

उन्हाळी सुटीत शिक्षकांना उपक्रमशील बनविण्यासाठी चर्चासत्रे, शिबिरे व शिक्षकांची शैक्षणिक संमेलने आयोजित करतात. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय व राज्य स्तरावरून शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण दिले आहे. एन.सी.ई.आर.टी., नवी दिल्लीमार्फत त्यांनी शाळेत आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला. त्यामुळे रजापूर शाळेची निवड या उपक्रमासाठी पायलेट प्रोजेक्ट म्हणून झाली आहे. नाट्यीकरणातून मराठी भाषा वर्गाध्यापन या त्यांनी शाळेत राबविलेल्या नवोपक्रमाचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे. त्यांना यापूर्वी संभाजीनगर जिल्हा परिषदेचा २०१६ चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविलेले आहे. ग्रामीण विकास संस्था, पारुंडी यांनी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे. ग्रामपंचायत रजापूरने त्यांच्या कार्याचा गौरव प्रशस्तीपत्र देऊन केला आहे. संभाजीनगर जिल्हा प्राथमिक विभागातून त्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल, गटशिक्षणाधिकारी अफजाना खान, विस्तार अधिकारी अनिल पुदाट, रमेश ठाकूर, व्यंकटेश कोमटवार, केंद्रप्रमुख पंडित भोसले, सीताराम चव्हाण, मुख्याध्यापिका चंद्रकला काळे, सरपंच मनीषा शिंदे, उपसरपंच रुख्मणबाई भिसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा कमलबाई तांडेकर, उपाध्यक्ष लक्ष्मीबाई भिसे, तंटामुक्ती अध्यक्ष आसाराम मोर्चे, रमेश गोर्डे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.