हिंदुस्थानचा पहिला मतदार वयाच्या शंभरीतही करणार मतदान

सामना ऑनलाईन । शिमला

हिमाचल प्रदेशमध्ये ७ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यावेळी वयाच्या शंभरीत पोहोचलेला हिंदुस्थानचा पहिला मतदार मतदान करणार आहे. मागील ६६ वर्षांपासून मतदानाचा हक्क बजावणारे हिंदुस्थानचे पहिले मतदार श्याम शरण नेगी यांना वयोमानामुळे चालणे-फिरणे कठीण झाले आहे. मात्र आपला मतदानाचा हक्क बजावण्यास ते उत्सुक आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने नेगींचे घर असलेल्या किन्नोरपासून ते जवळच्या मतदान केंद्रापर्यंत विशेष गाडीची व्यवस्था केली आहे. या गाडीतून प्रवास करुन श्याम शरण नेगी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

वयाची शंभरी गाठलेल्या देशाच्या पहिल्या मतदाराचे मतदान केंद्रावर लाल पायघड्या घालून स्वागत करण्यात येणार आहे. किन्नोरमध्ये २५ ऑक्टोबर १९५१ साली पहिले मतदान झाले होते. त्यावेळी नेगी यांनी पहिल्यांदा मतदान करून देशातील पहिल्या मतदाराचा मान मिळवला होता. निवडणूक आयोगाने १९५२च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पहिल्या निवडणुका होतील असे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांनी हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये त्याआधीच निवडणूका घेण्यात आल्या. त्यावेळी नेगी यांनी किन्नोर येथील मतदान केंद्राचे अधिकारी म्हणून काम पाहिले होते.

किन्नोर हा अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे मतदानाचे महत्त्व लोकांना माहिती नव्हते. नेगी यांनी तेथील लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. तब्बल एक महिना या परिसरात प्रचार करून त्यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. नेगी यांच्या या योगदानाबद्दल त्यांना अनेकदा गौरवण्यात आले आहे. २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीच्यावेळी नेगींचा एक व्हिडिओ बनवण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये नेगी यांनी त्यांच्या पहिल्या मतदानाची गोष्ट सांगितली होती.

पहा हा खास व्हिडिओ –