श्रीमद् राजचंद्रांच्या भव्य प्रतिमेची स्थापना

सामना ऑनलाईन । मुंबई

महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक मार्गदर्शक श्रीमद् राजचंद्र यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील धरमपूर येथील आश्रमात त्यांच्या ३४ फुटी भव्य प्रतिमेची स्थापना नुकतीच करण्यात आली. याप्रसंगी राजचंद्रांच्या महामस्तकाभिषेकासह अत्याधुनिक सुविधायुक्त २०० खाटांच्या रुग्णालयाचेही उद्घाटन करण्यात आले.

महात्मा गांधी यांचे जीवन घडवण्यात श्रीमद् राजचंद्र यांचे मोठे योगदान आहे. धरमपूर येथे त्यांचे वास्तव्य राहिले होते. तेथील आश्रमातील भव्य जलाशयामध्ये त्यांच्या प्रतिमेची स्थापना केली गेली. त्यानंतर संतगणांच्या उपस्थितीत त्याच्यावर महामस्तकाभिषेक करण्यात आला. ‘युगपुरूष – महात्मांचे महात्मा’ या त्यांच्या जीवनावरील नाटकाचा एक हजारावा भागही यावेळी सादर केला गेला. सुमारे सात हजार भाविकांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढली गेली. तीन दिवस विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले गेले.

श्रीमद् राजचंद्र मिशनचे संस्थापक राकेशभाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात श्रीश्री रविशंकर, मोरारी बापू, विवेक सागर, चिदानंद सरस्वती, आचार्य लोकेश, भिक्खू संघसेना, ब्रम्हकुमारी डॉ. निर्मला यांच्यासह महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते. मुंबई आणि हिंदुस्थानच्या इतर राज्यांतील भाविकांप्रमाणे परदेशातील भाविकांचीही या भक्तीसोहळ्यात उल्लेखनीय उपस्थिती होती.