२०० ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभी करणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तथा आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील साधारण २०० किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची निवासव्यवस्था उभारण्यात येणार आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याशी समन्वय साधून राज्य शासनाचा पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करेल, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ५ ते २५ ऑक्टोबरदरम्यान राज्यात पर्यटन पर्व साजरे करण्यात येत आहे. पर्यटन पर्वाच्या काळात एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या पर्यटकांना प्रोत्साहन सवलत देण्यात येणार आहे. पारंपरिक पर्यटनाबरोबरच हेरीटेज टुरिझम, ऍग्री टुरिझम, क्रूझ टुरिझम, माइन टुरिझम, कॅराव्हान टुरिझम, वेलनेस टुरिझम, बॉलीवूड टुरिझम, वाइल्डलाइफ टुरिझम या पर्यटन क्षेत्रांना चालना देण्यात येणार आहे.