निसर्गाशी जोडलेले रहा…

506

महेश गायकवाड

जगभरात ५ जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम अगदी अनिवार्यतेने साजरा होतोच. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ५०० झाडं लावली तर त्यातली ५० तरी जगवता आली पाहिजेत. तरच हिरवाईचा खरा हेतू साध्य होईल. निसर्ग संवर्धन ही कृतीशून्य बाब न राहता निसर्गाशी एकरूप होता आलं पाहिजे तरच पर्यावरण दिनाचा खरा उद्देश साध्य होईल.

निसर्गाशी सुसंगत जोडलेले रहा’ असा संदेश आहे या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचा… निमित्त आहे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचे. कारण साधारणपणे ७० च्या दशकात पर्यावरण हा शब्द जिवंत झाला आणि जगात पर्यावरण आणि विकास अशा दोन शब्दांनी जगाला विचार करायला भाग पाडले. मानवाला जर आनंदी आणि समाधानी राहायचे असल्यास निसर्गाशी दोस्ती करणे गरजेचे आहे. कारण जगातील जेवढी जैवविविधता जास्त तेवढा जगण्यातील आनंद आणि समाधान जास्त मिळते हा निसर्गाचा नियम हे ध्यानात ठेवले पाहिजे.

आपण पर्यावरण दिन साजरा करताना अनेक धोके आपल्या समोर असल्याचे पाहत आहोत. यात जागतिक तापमान वाढ अतिशय महत्त्वाचा मुद्दा जगभर गाजत असून यावर उपाय म्हणून सध्या तरी आपण सर्व जगभर विचार करतोय, मात्र कृतीमधून काहीच करताना दिसत नाही. मराठीत एक सुंदर म्हण आहे ती म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.’ कारण आजकाल पर्यावरण दिन साजरे करणे म्हणजे एक फॅशन झाली असून यात कृतिशून्य बाबी करताना आजच्या समाजाला खूप मोठ्या आनंद दिसून येत आहे. ५ जून १९७२ साली या पर्यावरण दिनाची सुरुवात झाली आणि जगभरात हा दिवस पर्यावरण, वन्यजीव, जंगल संवर्धनविषयक जनजागृती व्हावी असे ठरविण्यात आले.

या वर्षी ‘निसर्गात चला आणि निसर्गाशी एकरूप व्हावे’ असा संदेश जगभर देण्यासाठी या वर्षी जनजागृती करण्यात येणार असून यासाठी आपल्या परिसरातील अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान, संरक्षित वने, टेकड्या अशा भागांत जाऊन फेरफटका मारून आपल्यामध्ये खूप ऊर्जा आणि उत्साह निर्माण करता येईल या हेतूने ही कल्पना तयार केली असून यात आपण आपल्या परिसरातील असलेल्या जंगली भागात जाऊन कचरा, प्लॅस्टिक अशा गोष्टी गोळा करून घरी आणून त्यांची विल्हेवाट लावावी. जेणेकरून आपण पर्यावरणपूरक दिन साजरा करून पुढील पिढीला स्वच्छ परिसर आणि निरोगी वातावरण देऊन एक नवीन चांगल्या जीवनाची सुरुवात करावी. तसेच आनंद आणि समाधान फक्त जंगल भटकंतीमधूनच मिळत असते. म्हणून दररोज आपण निसर्गाशी एकरूप व्हावे आणि शेतकऱ्यासारखे कायम मातीशी आपले नाते घट्ट बनविण्यासाठी ५ जूनपासून सवय लावावी. तसेच मोबाईलपासून मुक्त व्हावे आणि निसर्गाशी समरस व्हावे या हेतूने हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे.

जगभरात जून महिना हा निसर्गातील नवीन पिढीच्या निर्मितीची सुरुवात करणारा असून सगळीकडे वृक्षारोपण करण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू होत असते. काही ठिकाणी मात्र ५ जूनला पाऊस येत नसल्याने जुलै महिन्यात वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात येत असते, मात्र बरेचजण या कार्यक्रमात हजारो झाडे लावतात. मात्र झाडे लावल्यानंतर सेल्फी काढून झाला की पुन्हा त्याकडे बघतच नाहीत. मात्र काहीजण त्या रोपाला अनकेदा पाणी देऊन जिवंत ठेवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करीत असतात. आणि गरज आहे झाडे जगविण्याची त्यांचा सांभाळ करण्याची. कारण लाखो झाडे लावण्यापेक्षा शेकडो झाडे जगविणे महत्त्वाचे असून यापुढील काळात लावण्यापेक्षा झाडे जगविण्यासाठी मोहीम हाती घेतली पाहिजे.

निसर्गात वटवाघळं वर्षभर झाडे लावण्याचे काम करीत असतात, मात्र ते कधी सेल्फी काढत नाहीत. रात्रभर एका झाडाच्या बिया दुसरीकडे टाकण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे वटवाघळं करीत असतात. शिवाय आपल्यासारखे चुकीची झाडे वटवाघळं करीत नाहीत हे महत्त्वाचे कारण. आपण अनेक परदेशी झाडे लावून अन्नसाखळी नष्ट करण्याचे काम अतिशय वेगाने करीत आहोत. वटवाघळं मात्र स्थानिक देशी आणि बहुपयोगी झाडे लाऊन निसर्ग समतोल ठेवण्याचे काम करीत असतात. साधारणपणे ३५० पेक्षा जास्त जातीची झाडे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात यात आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकते हे वटवाघळाला समजते. यात पाडाला पिकलेला आंबा सुरुवातीला वटवाघळे खातात आणि मग शेतकरी आंबे उतरवितो आणि मग आडी लावली जाते.

जगातील कोणताही जीव चुकीची झाडे लावत नसून यात फक्त मानवच चुकीच्या पद्धतीने परदेशी झाडे लावून जैवविविधता नष्ट करण्याचे काम करीत आहे. याला कुठेतरी जनजागृतीची गरज असून वेळीच आपण अशा चुकीच्या वृक्षारोपण करणाऱ्या लोकांना थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा हिरवळ दिसेल, मात्र जैवविविधता दिसणार नाही. काही निरीक्षणातून असे पुढे येत आहे की, गेल्या २५ वर्षांत आपण शहरी भागात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाडे परदेशी व किफायतशीर नसलेली लावल्याने आज अशा प्रकारे वटवाघळं, पक्षी व विविध प्राणी यांची अन्नसाखळी तुटत चालली आहे.

आपण उंदिरमारी, सुभाबूळ, निलगिरी, गुलमोहर, सुरू, सप्तपर्णी, रेनट्री, शिसम अशी झाडे लाऊन अनेक फलहारी जीवांना धोक्यात घेऊन जात आहोत. यापुढील काळात जैवविविधतापूरक झाडे लावणे गरजेचे असून यात आंबा, पेरू, सीताफळ, रामफळ, जांभूळ, चिकू, वड, उंबर, नांदरूक, पिंपळ, भोकर, कवठ, हादगा, बोर, चिंच, काटे सावर, पांगारा, पळस, केळी, कडुलिंब, बकुळ, हिरडा अशी विविध किफायतशीर व पर्यावरणपूरक अशीच झाडे लावल्यास शेतकरी व वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल.

जलजागृतीमध्ये नदीला अतिशय महत्त्व दिले पाहिजे. कारण नद्यांच्या काठावर वसलेली मानवी वसाहत धोक्यात आली असून नदीकिनारे स्वच्छ आणि वाळूने भरलेले असले पाहिजेत. आता तरी एक कुटुंब एक घर असेच जगावे लागेल तरच नदीकिनारी आपल्याला वाळू पाहावयास मिळेल, अन्यथा घर बांधणीसाठी लागणारी वाळू आपल्याला वाळूसम्राट पुरवतील मात्र यात दोष आपलाच असेल. कारण १०० घरे मिळतील, पण १०० लिटर स्वच्छ पाणी मिळणार नाही जर नदीत वाळू नसेल तर…ऑक्सिजन हवा असेल तर आपल्या परिसरात देशी झाडे असणे खूपच गरजेचे असून यात स्थानिक झाडांना महत्त्व दिलेच पाहिजे. आता तरी आपण निसर्गाकडे जाताना आणि येताना आपल्या पाऊलखुणाऐवजी कचरा वगैरे काहीच ठेवू नये अशी अपेक्षा. कारण तरच निसर्गाशी समरस होता येईल…

मुंग्या, अनेक कीटक अनेक प्रकारच्या बिया जमिनीखाली घेऊन जात असतात बहुतेकदा पावसाळ्यातच या बिया रुजतात आणि यांचे खूप मोठे वृक्ष तयार होत असतात. वाळवी जंगलाची डॉक्टर म्हणून ओळखली जाते. कारण सर्वात वेगाने गांडूळ आणि वाळवी जंगलाल खत देण्याचे काम सातत्याने करीत असतात. म्हणून जंगले आपल्याला दणकट आणि हिरवीगार दिसून येतात. आपली दैनंदिन सवयीत अनेक बदल करणे काळानुसार गरजेचे असून यात प्लॅस्टिक व थर्माकोल वापर बंद, वातानुकूलित व्यवस्था बंद करणे, कुटेही कचरा करणे बंद करणे, नदीत कचरा टाकणे बंद करणे अशा अनेक सवयी तातडीने बंद करणे अतिशय महत्त्वाचे असून जर आपण सवयीत बदल केला नाही तर मात्र फक्त पर्यावरण दिवस साजरे होतील. मात्र आपली वाटचाल मरणाकडे वेगाने सुरू होईल…

मारुती चितमपल्ली नेहमी सांगतात की सध्याची पिढी खूपच माहितीचा साठा असलेली आहे, मात्र कमी बुद्धिवादी आहे. म्हणून यापुढील काळात आपण निसर्गात जाऊन प्रत्यक्ष एक झाड लावून त्याची किमान पाच वर्षे काळजी, निगा राखून वाढविणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक वर्षी झाडे लावणाऱ्यांनी मागच्या वर्षी लावली झाडे जिवंत नसतील तर लावू नयेत. कारण या वर्षीही तेच होईल यापेक्षा दुसऱ्याने लावलेल्या झाडांचे संगोपन केले तर किमान ते झाड जगेल आणि हिरवळ वाढेल हे ध्यानात घावे… बिया रोपण करताना त्या बियाच्या उंचीच्या दुप्पट जमिनीखाली बियाला पुरावे म्हणजे सहजपणे त्यातून कोंब बाहेर येऊन झाड तयार होऊ शकते. विनाकारण मोठा खड्डा करून त्यात बिया टाकू नयेत. शिवाय झाड लावतानादेखील अर्धा ते पाऊण फुटापेक्षा जास्त खोल खड्डा घेऊ नये. तसेच वरील बाजूची माती झाड लावताना सुरुवातीला टाकून वर मुरुमासारखी खड्ड्यातून निघालेली माती टाकणे.

कृपया परदेशी बिया अथवा झाडे लावू नयेत. झाड लावताना साधा विचार करावा की, ज्या झाडांची पाने, फुले, फळे, साल आपण खाऊ शकतो अशीच झाडे लावावीत. आपल्याबरोबर इतर सर्व जीवही खाऊ शकतात. जगातील जंगले हिरवी ठेवण्याचे काम वटवाघळे २३ टक्क्यांपेक्षा जास्त करीत असतात तसेच पक्षी, कीटक, सस्तन प्राणी असे नानाविध जीव पृथ्थीवर जैवविविधता वाढविण्याचे काम अविरतपणे करीत आहेत. आपलाही वाटा मुंगीच्या वाट्याएवढाच असावा, मात्र तो मुंगीएवढा प्रामाणिक असावा… आजच्या काळात वन्यजीव, शेतकरी आणि माती यांची नाळ घट्ट असून आपलीही नाळ याच मातीला बांधून पुढील प्रवास करावा लागेल यात शंकाच नाही…

(लेखक पर्यावरणतज्ञ असून निसर्ग जागर प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या