इगतपुरीत वर्षभरात फक्त पाच जणांची नसबंदी , नसबंदी शस्त्रक्रियेकडे पुरुषांची पाठ

75
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन, इगतपुरी

लोकसंख्या स्थिरावण्यासाठी सुरू असलेल्या कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेत इगतपुरी तालुक्याने 82 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासह 97 टक्के प्रसूत्या आरोग्य संस्थेत होत असल्याने माता बाल मृत्यूचेही प्रमाण घटले आहे. मार्च अखेरपर्यंत 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे. संपूर्ण तालुक्यात वर्षभरात केवळ 5 पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. यातून नसबंदीकडे पुरुषांनी पाठ फिरवल्याचे दिसते. लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी महिलांनाच पार पाडावी लागत असल्याने महिलांमध्ये नाराजी आहे.

कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत इगतपुरी तालुक्याला 1 हजार 453 इतक्या महिलांच्या शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी 15 टक्के पुरुषांची नसबंदी करण्याचे लक्ष्य असते. तालुकाभरात अवघ्या 5 पुरुषांनी नसबंदी करून घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैतरणा, काननवाडी, काळूस्ते या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी त्यांना दिलेले 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तर सर्वात कमी 70 टक्के शस्त्रक्रिया खेड प्राथमिक केंद्रात झाल्या आहेत.

कुटुंब नियोजनासाठी इगतपुरी तालुक्यात बेलगाव कुऱहे, वाडीवऱहे, नांदगाव सदो, काळुस्ते, खेड, धामणगाव, वैतरणा, काननवाडी या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. यासाठी तांबी, गर्भनिरोधक गोळय़ा, निरोध या साधनांचा प्रभावी वापर करण्यात येतो. मात्र लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी पुरुषांची नसबंदी सोपी असूनही याकडे पुरुषांनी पाठ फिरवल्याने महिलांवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो, जड काम करावे लागते अशी अनेक कारणे देत पुरुष नसबंदीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे सरकारचे संतती नियमनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून महिलांचे दुसऱया प्रसूतीनंतर समुपदेशन करण्यात येते. यानंतर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करीत लक्ष्य पूर्ण केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

कायद्याने आता कोणावरही नसबंदीची सक्ती करता येत नाही. मात्र यामध्ये स्वतःहून सहभाग घ्यावा यासाठी शासकीय पातळीवर कुटुंब नियोजनासाठी विशेष कार्यक्रम राबविले जातात. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये नसबंदीची जबाबदारी पुरुषांनी स्त्रयांवरच टाकली असल्याची बाब दिसून येत आहे. इगतपुरी तालुक्याचे काम अन्य तालुक्यांच्या तुलनेत चांगले असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी कौतुक केले आहे.

सोशल मीडियावर मुलगी, बहीण, पत्नी, आई यांच्याबाबत सकारात्मक पोस्ट टाकणारी पुरुष मंडळी कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेवेळी जबाबदारी झटकतात. ही दांभिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे पुरुषांनी पुढे येऊन नसबंदी करणे आवश्यक आहे-माधुरी भदाणे, कार्याध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड

शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना तासाभरात घरी सोडले जाते. यानंतर तो कोणतेही जड काम करू शकतो. यामुळे लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. त्यांना एक हजार पाचशे रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते-डॉ. एम. बी. देशमुख, तालुका आरोग्याधिकारी इगतपुरी

स्त्रयांची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया अवघड आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांना 7 दिवस रुग्णालयात थांबावे लागते. त्यामुळे पुरुषांनी स्वतःहून संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी पुढे आले पाहिजे-वंदना सोनवणे, बालविकास प्रकल्पाधिकारी इगतपुरी

 

आपली प्रतिक्रिया द्या