दगडांना बोलकं करणारी ऋतिका

22

सामना प्रतिनिधी । कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील ऋतिका‌ विजय पालकर हीची ओळख दगडांना बोलकं करणारी ऋतिका म्हणूनच सर्वश्रूत झाली आहे. शिक्षण बीएससी आयटी आणि व्हीडिओ/फोटो एडिटिंगची आवड. वडिलांच्या न्युज एडिटिंग क्षेत्रात मदत करताना तिला स्टोन आर्टचा छंद लागला आणि त्यातूनचे तिने नाव लौकीक कमावला.

मुळातच वडिलांकडून कलेची नजर लाभलेली ऋतिका दगडांमध्ये वेगवेगळे आकार निरखू लागली. वडील विजय पालकर हे काष्ठशिल्पकार असून ते १९९८ पासून काष्टशिल्प तयार करतात त्यामुळे लहानपणापासून काष्टशिल्प शोधण्यासाठी कोकणातील नदी किनारी, समुद्र किनारी, जंगलांमध्ये फेरफटका ठरलेलाच. त्यातूनच तिला एखाद्या टाकावू लाकडामध्ये सुद्धा वेगवेगळे आकार शोधण्याची नजर वडिलांच्या सानिध्यात मिळाली. वडील काष्टशिल्प घडवत असताना तिने नदी पात्रातील, समुद्र किनाऱ्यावरील दगडांना आपल्या कलाकृतींचे माध्यम निवडले. या लहान मोठया, वेगवेगळ्या रंगांच्या दगडांमध्ये तिला अनेक आकृती खुणावू लागल्या. याच छंदातून बनवलेली तिची पहिली कलाकृती एका दर्दी व्यक्तीने विकत घेतल्याने या‌ कलेला व्यावसायिक स्वरुप देण्याचे ऋतिकाने ठरवले.

घरच्या लोकांचा पाठिंबा आणि निसर्गाकडून प्रेरणा घेत तिने विठ्ठल, गणपती, कृष्ण, कोकणी ग्रामीण जीवनावर आधारित व्यक्तीरेखा अशा कलाकृतींची निर्मिती केली.अनेक लहान मोठ्या दगडापासून विशिष्ट रचनेतून शिवरायांची व्यक्तीरेखा,‌ मेंढपाळ, प्रेमी युगुल,पशू-पक्षी, फुले अशा अनेक कलाकृतींची निर्मिती तिने केली आहे.

ऋतिका आपली कलाकृती घडवताना दगडांना कोणताही आकार देत नाही किंवा रंग देत नाही. निसर्गाने जे बनवले‌ आहे ते जसेच्या तसे वापरून विशिष्ट प्रकारे मांडणी करून त्यातून विविध कलाकृती लोकांसमोर मांडते.

तिची प्रत्येक कलाकृती ही युनिक आहे कारण निसर्गही एक दगड जशास तसा पुन्हा बनवत नसेल. त्यामुळे ऋतिकाने बनवलेली एखादी कलाकृती जर तुमच्याजवळ असेल तर तशीच दुसरी कलाकृती इतर कोणाकडेही असणार नाही. ऋतिकाची प्रत्येक कलाकृती वेगळी आहे आणि हेच या कलेचे वैशिष्ट्य आहे.

या कलाकृती घडवत असताना तिला ९ नोव्हेंबर ते १५नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्ली येथील‌ ऑल इंडिया फाईन आर्ट ॲन्ड क्राफ्ट सोसायटी या ख्यातनाम आर्ट गॅलरी मध्ये कला प्रदर्शनाचा योग आला. दिल्ली येथील प्रदर्शनामध्ये ऋतिकाच्या नैसर्गिक दगडी कलाकृतींना योग्य न्याय मिळाला. प्रदर्शन काळात स्टॅचू ऑफ युनिटीचे निर्माते श्री.राम सुतार सरांकडून तिच्या कलेचे कौतुक झाले व आशिर्वाद लाभला. राम सुतार सरांची भेट आणि त्यांचे आशीर्वाद हे खुप मोठे भाग्य असल्याचे ऋतिका सांगते. प्रदर्शनाचे उद्घाटक ख्यातनाम अर्थतज्ञ खासदार नरेंद्रजी जाधव सरांनी ऋतिकाची ‘आईने कडेवर घेतलेले मूल’ या कलाकृती मध्ये आपल्याला त्या बाळाच्या चेहर्यावरील हावभावही दिसतात अशा शब्दांत कौतुक केले व‌ ती कलाकृती विकत धेवून आपल्या अभ्यासिकेत तिला स्थान दिले आहे. दिल्ली येथील प्रदर्शनामध्ये ऋतिकाच्या अनेक कलाकृतींची विक्री झाली.

आपण बनवलेली कलाकृती इतरांच्याही मनापर्यंत पोहचत आहे हेच आपले खरे यश आहे, असे ती म्हणते. सरावानेच दगडातील आकार लक्षात येतात व वेगवेगळ्या थीम सुचत जातात असा आपला अनुभव असल्याचे ऋतिका सांगते. भविष्यामध्ये आपण आपल्या कलेच्या माध्यमातून कोकणातील निसर्ग व संस्कृती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ती सांगते. ऋतिकाच्या या कलाकृतींचे शिवसेना खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनीही कौतुक केले आहे.