दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या गाडीवर हल्ला

सामना ऑनलाईन । पनवेल

भीमा कोरेगाव प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या गाडीवर पनवेल जवळ दगडफेक केली. ते पुण्याहून मुंबईला येत असताना ही दगडफेक झाली. सुदैवाने या प्रकारात त्यांना दुखापत झाली नाही. सरपोतदार यांनी फेसबुकवरून दगडफेकीची माहिती दिली.

मी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना पनवेलजवळ माझ्या व आजुबाजुच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने मी शेवटच्या रांगेत असल्याने माझ्या गाडीचे काहीही नुकसान झाले नाही. पण अनेक गाड्यांचे नुकसान झाले. घटनास्थळी एकही पोलीस नव्हता. दोन्हीकडच्या ट्रॅफिकवर याचा परिणाम झाला आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्या. अशा प्रकारचा जातीय हिंसाचार आपल्या समाजाला कलंक आहे. असे सरपोतदार यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे.