बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ताफ्यावर हल्ला

सामना ऑनलाईन । पटना

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. बक्सर जिल्ह्यातील समीक्षा यात्रेदरम्यान त्यांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केला आहे. नंदर भागातून नितीशकुमार यांच्या गाड्यांचा ताफा जात असतांना अचानक काही लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले असले तरी त्यांचे काही सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सध्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बिहार राज्याचा दौरा करत आहेत. त्याचवेळी जमावाने मुख्यमंत्र्याच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. गावामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास न केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची चर्चा आहे.