
सामना ऑनलाईन । मुजफ्फरनगर
नोटाबंदीला चाळीस दिवस होत आले तरी बँकेतून स्वतःचे पैसे रोख स्वरुपात मिळवणे कठीण झाले आहे. पैसे मिळवण्यासाठी कित्येक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. लोकांचा धीर सुटत चालला आहे. हक्काचे पैसे मिळवणे कठीण झाल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर दगडफेक केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरपासून ४० किमी अंतरावरील शामली येथे घडली. नोटाबंदीनंतर बँकेवर मोठा हल्ला होण्याची ही देशातील दुसरी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याआधी कानपूरमध्ये बँकेच्या आवारात नागरिकांनी तोडफोड केली होती. देशाच्या विविध भागांमध्ये पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रित केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अनेक ठिकाणी बँकेतून अथवा एटीएममधून पैसेच मिळत नाहीत किंवा थेट २ हजाराच्या नोटांच्या स्वरुपात मोठी रक्कम देण्याचे प्रकार सुरू आहेत. या उलट काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना नाण्यांच्या २-५ पिशव्याच दिल्या जात आहेत. या सगळ्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालय नोटाबंदी लागू झाल्यापासून सातत्याने नवे निर्णय जाहीर करत आहे. हे कमी म्हणून सोशल नेटवर्कवरुन उलटसुलट सरकारी आदेशांच्या बातम्या फिरत आहेत. त्यामुळे नागरिक पुरते गोंधळले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करुन नागरिकांनी सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्याने जुन्या नोटा कागदाच्या तुकड्यात जमा झाल्या आहेत. जेवढ्या तत्परतेने जुन्या नोटा बंद करण्यात आल्या त्याच तत्परतेने नवीन नोटा मात्र उपलब्ध होत नसल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होवू लागला आहे.